बिबवेवाडी, हडपसर क्षेत्रीय कार्यालयांची निवड : रूपरेषा तयार
पुणे – वाढत्या करोना रुग्णसंख्येला अटकाव करण्यासाठी महापालिकेने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, स्वॅब तपासणी, रॅपिड ऍन्टिजेन किट तपासणी आणि वेळेत रुग्ण शोधण्यासाठी “पथदर्शी प्रकल्प’ सुरू केला आहे. यासाठी बिबवेवाडी आणि हडपसर क्षेत्रीय कार्यालयांची निवड केली आहे.
महापालिका आणि पोलिसांमार्फत करोना संक्रमित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती दररोज घेतली जाते. त्यासाठी तांत्रिक पथकांची नेमणूक केली आहे. याद्वारे शोधलेल्या व्यक्तींचे तातडीने स्क्रिनिंग केले जाते. यापुढे निवडलेल्या भागात या स्क्रिनिंगवर अधिक भर देण्यात येणार आहे. बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अप्पर इंदिरानगर आणि हडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत माळवाडी हा भाग पथदर्शी प्रकल्पासाठी निवडला आहे.
तांत्रिक पथकाद्वारे शोधलेल्या पॉझिटिव्ह, निगेटिव्ह तसेच रुग्णांच्या संपर्कातील अति जोखमीचे आणि कमी जोखमीच्या व्यक्तींचे अधिकाधिक स्क्रिनिंग केले जाणार आहे. त्याची रूपरेषाही ठरवली आहे. अधिकाधिक कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि अधिकाधिक स्क्रिनिंगमुळे बाधित रुग्णांचा तपास लावून त्यांच्यावर उपचार देणे शक्य होणार आहे. वेळेत उपचार मिळाल्याने मृत्यूदर कमी होण्यासही मदत होणार आहे. या पथदर्शी प्रकल्पाचे कामकाज व्यवस्थित चालण्यासाठी अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांचे पथक तयार केले आहे.
अशी असेल कामकाजाची रूपरेषा
1. सर्वप्रथम कार्यक्षेत्रातील घरांची संख्या आणि लोकसंख्या निश्चित करून त्या भागात आढळून आलेल्या रुग्णांपैकी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि पोलिसांच्या फॅक्ट रिपोर्टनुसार किती व्यक्तींचे सर्वेक्षण झाले आणि अद्यापही किती कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होणे बाकी आहे याचा दैनंदिन आढावा घेतला जाणार आहे.
2. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींपैकी लक्षणे असणारी आणि अन्य व्याधी असलेल्या (कोमॉरबीड) लोकांची यादी करून सर्वेक्षणाच्या ठिकाणीच निश्चित केलेल्या स्वॅब कलेक्शन सेंटरवर रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट करून घेतली जाणार आहे.
3. या कार्यक्षेत्रात सर्वेक्षण आणि अन्य पथकांमार्फत थर्मल स्क्रिनिंग आणि पल्स ऑक्सिमिटरद्वारे तपासणी करून त्यात उच्च तापमान आणि ऑक्सिजन लेव्हल कमी असणाऱ्या रुग्णांची स्वॅब कलेक्शन सेंटरवर ठिकाणी रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट करून घेतली जाणार आहे.
4. सर्व टेस्ट निगेटिव्ह आलेल्या रुग्णांना मोबाइल रुग्णवाहिका दवाखान्यामार्फत व्हिटॅमिन आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारी औषधे देण्यात येणार आहेत. तसेच रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना त्वरित कोविड केअर सेंटरमध्ये विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.
5. पुढील 15 दिवसांत सर्व निगेटिव्ह कॉंटॅक्टचा पाठपुरावा करून लक्षणे आढळल्यास स्वॅब तपासणी करून घेण्यात येणार आहे.