भीषण अपघातात हेल्मेटचे तुकडे; २५ वर्षीय युवक जागीच ठार

कवठे (प्रतिनिधी) – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वेळे, ता. वाई गावच्या हद्दीत खंबाटकी घाटात पुणे-सातारा लेनवरील तीव्र उतारावर गुरुवारी सकाळी 8.15 च्या सुमारास ट्रकला मोटारसायकलची (क्र. एमएच-11-बीडब्ल्यू-0837) पाठीमागून जोरदार धडक बसून म्हसवे, ता. जावळी येथील अक्षय सदाशिव शिर्के (वय 25) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेल्या गणेश उर्फ नंदू विनायक शिर्के (वय 23, रा. म्हसवे) यास किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळाली माहिती अशी, म्हसवे, ता. जावळी येथील अक्षय व गणेश हे आसवली, ता. खंडाळा येथील पॉश सीनॉ टिया नावाच्या कंपनीत नोकरीस होते. ते काल (दि. 27) रोजी सायंकाळी 6.30 पासून रात्रपाळीला होते. ते गुरुवारी सकाळी ड्युटी संपवून अक्षयच्या मोटारसायकलीवरून म्हसवे येथे परत निघाले होते. ते 8.15 च्या सुमारास खंबाटकी घाटाची चढण चढून तीव्र उतारावर आले.
वेळे गावच्या मोटारसायकल आली असता पुढे असलेल्या ट्रकच्या चालकाने कदाचित अचानक ब्रेक लावला असावा. त्यामुळे त्यांची दुचाकी ट्रकवर आदळली. या भीषण अपघातात चालक अक्षय शिर्के याच्या डोक्यावरील हेल्मेटचे तुकडे होऊन, कवटी फुटली. त्यामुळे अतिरक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मागे बसलेला गणेश शिर्के किरकोळ जखमी झाला.
या अपघाताची माहिती मिळताच भुईंज पोलीस ठाण्याचे हवालदार चंद्रकांत मुंगसे, विजय अवघडे, मंदार शिंदे व किर्दत हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी कवठे, ता. वाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविला. शिर्के याची दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली असून अपघाताला कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा शोध घेण्यात येत आहे. अक्षय हा अविवाहित होता. त्याच्या अपघाती निधनाने म्हसवे गावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, गेल्या पाच दिवसांत वाई तालुक्यात पाच रस्ते अपघातांमध्ये पाच जणांचा बळी गेल्याने पोलिसांनी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.




