Satara: विविध विकास निधीमधून सर्व शाळांचा भौतिक विकास साधणार
Satara सर्व तालुक्यांमधील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन वेळेत घेण्यात यावेत तसेच तालुकास्तरावर घेण्यात येणार्या विविध क्रीडा स्पर्धांना लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात यावे, याबाबत शिक्षण सभापतींनी सूचना दिल्या.

Satara: काळात विविध विकास निधीमधून जिल्ह्यातील सर्व शाळांना निधी देऊन सर्व शाळांचा भौतिक विकास साधण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण, अर्थ व क्रीडा समितीच्या सभापती तेजस्विनी कदम यांनी दिली. सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची सभा नुकतीच पार पडली. या सभेमध्ये गणवेश वाटप, पाठ्यपुस्तक वाटप यावर चर्चा झाली. जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप झालेले आहे, याबाबत सर्व केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी यांच्या मार्फत आढावा घेतला आहे,असे गटशिक्षणाधिकारी यांनी सांगितले.
या बैठकीमध्ये शालेय पोषण आहारावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन 100 टक्के झाल्याबद्दल शिक्षण विभागाचे अभिनंदन करण्यात आले.
दर रविवारी इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिष्यवृत्ती चाचणी घेण्यास या सभेत मंजुरी देण्यात आली. विनोबा अॅपच्या माध्यमातून नवोदय परीक्षेच्या तयारीसाठी दोन सराव चाचण्या घेण्यात आल्या, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
सर्व तालुक्यांमधील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन वेळेत घेण्यात यावेत तसेच तालुकास्तरावर घेण्यात येणार्या विविध क्रीडा स्पर्धांना लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात यावे, याबाबत शिक्षण सभापतींनी सूचना दिल्या.
या बैठकीला जि. प. सदस्य किरण नलवडे, अमित चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अनिस नायकवडी , शिक्षणाधिकारी (माध्यमिक व योजना) शबनम मुजावर, उपशिक्षणाधिकारी हणमंत यादव, सन्मती देशमाने, सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी उपस्थित होते.





