China -Philippines : चीनपासून संरक्षणासाठी फिलिपीन्स खरेदी करणार क्षेपणास्त्रे

बीजिंग : चीनच्या संभाव्य धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी फिलिपीन्सने मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. फिलिपीन्सच्या लष्करी अधिकाऱ्यांनी नुकतेच याबाबतची माहीती दिली होती. मात्र फिलिपीन्सच्या या योजनेवरून चीनने जोरदार आगपाखड केली आहे. मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांना तैनात करण्याचा फिलिपीन्सचा निर्णय अत्यंत बेजबाबदार आणि चिथावणीखोर असून यामुळे प्रादेशिक तणाव वाढू शकतो, असे चीनने म्हटले आहे.
दक्षिण चीन समुद्रात चीन आणि फिलिपीन्समध्ये वारंवार संघर्षाचे प्रसंग येत असतात. फिलिपीन्सच्या भूभागाचे आणि जहाजांचे रक्षण करण्यासाठी मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदी केली जाणार आहेत. यासंदर्भात वाटाघाटी सुरू असून ही यंत्रणा देशाच्या संरक्षणासाठी व्यवहार्य आणि जुळवून घेण्यायोग्य असल्याचे लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले होते.
अमेरिकेने एप्रिलमध्ये उत्तर फिलीपिन्समध्ये टायफन मिडरेंज क्षेपणास्त्र प्रणाली तैनात केली होती. तसेच दोन्ही देशांचे सैन्य अवजड शस्त्रांच्या संभाव्य वापरासाठी संयुक्तपणे प्रशिक्षण देत आहेत. त्यांनी फिलीपिन्समध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना वाढवण्यासाठी ही प्रणाली अनिश्चित काळासाठी ठेवण्याचे देखील मान्य केले आहे. अमेरिकेकडून फिलिपीन्सला लष्करी मदत देण्यावर चीनकडून सातत्याने आक्षेप घेतला जातो आहे.





