Phaltan Traffic: फलटणकरांनो लक्ष द्या! पालखी मुक्कामादरम्यान वाहतूक मार्गात मोठे बदल; ‘हे’ आहेत पर्यायी मार्ग
Phaltan Traffic: १७ जुलै रोजी माऊलींची पालखी फलटण विमानतळावर विसावणार; सुरळीत वाहतुकीसाठी तांबमाळ ते पालखी तळापर्यंत पोलिसांकडून रूट मॅप जाहीर.

Phaltan Traffic – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा फलटण मुक्कामी असताना वाहतूक मार्ग बदल करण्यात आले असून निश्चित केलेल्या मार्गाचे पालन करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त दि. 17 रोजी पालखी फलटण विमानतळ येथे मुक्कामी येणार आहे. या अनुषंगाने पालखीसोबत असलेल्या वाहनांच्या सुरक्षित व सुरळीत वाहतुकीसाठी फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत पुढीलप्रमाणे वाहतूक मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
यामध्ये दि. 17 रोजी पालखीसोबतच्या फलटण पालखी तळाकडे जाणारे वाहनांसाठी तांबमाळ येथील निरा उजवा कालवा, नवीन पालखी मार्गावरील उड्डाणपुलाचा वापर करून पुढील मार्गाने वाहतूक करण्यात येईल. तांबमाळ चौधरवाडी उड्डाणपूल-सस्तेवाडी उड्डाणपूल-कांबळेश्वर उड्डाणपूल -धुळदेव उड्डाणपुलाखालून यू-टर्न -बारामती रोड उड्डाणपूल- सोमवार पेठ नाना पाटील चौक-दहिवडी चौक-डी.एड. चौक-गिरवी नाका-फलटण पालखी मुक्काम. या संपूर्ण नवीन पालखी मार्गावर पोलीस अधिकारी, अंमलदार व होमगार्ड यांचा आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, बॅरिकेडिंग पॉईंट तसेच वाहतूक डायव्हर्शन पॉईंट निश्चित करण्यात आले आहेत.
शनिवारी पालखी बरड मुक्कामाकडे प्रस्थान
दि. 18 रोजी पालखी फलटण विमानतळ येथून पुढे विडणी विसावाकडे रवाना होत असताना पालखीसोबतच्या वाहनांनी पुढील पर्यायी मार्गाचा वापर करावा. दहिवडी चौक-कोळकी तिकटणे-सोनवडी फ वडले (फौजीनगर) येथून डावीकडे वळून माझेरी मार्गे -विडणी पालखी विसावा या मार्गाचा वापर करावा. पिंप्रद येथे दुपारच्या जेवणाच्या विसाव्यास जाणार्या वाहनांनी वरील मार्गाचा वापर करून पुढे वडले गावातून डाव्या बाजूस वळून पिंप्रद पालखी विसावा स्थळी जावे.
बरड मुक्कामी जाणार्या वाहनांनी वरील मार्गाचा वापर करून पुढे पिंप्रदवरुन मिरडे फाटा येथून डावीकडे वळून बरड मुक्काम स्थळी जावे. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पोलीस प्रशासनाने निश्चित केलेल्या मार्गाचे पालन करावे, वाहतूक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे व पोलीस यंत्रणेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.






