Phaltan News : फलटणकरांचे २०० कोटी पाण्यात! भुयारी गटार योजनेच्या चौकशीची रणजितसिंह नाईक-निंबाळकरांची मागणी

प्रभात वृत्तसेवा
फलटण – नियोजन शून्य पद्धतीने भुयारी गटार योजनेचे काम केल्यामुळे शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून फलटणकर नागरिकांचे २०० कोटी रुपये पाण्यात गेलेले आहेत . ही योजना कशासाठी आणि कोणासाठी राबविली ? असा सवाल करीत या संपूर्ण योजनेची चौकशी करण्याची मागणी माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुरु करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ फलटण शहर अभियान शुभारंभ येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आ. सचिन पाटील, अभिजीत नाईक निंबाळकर, जयकुमार शिंदे, दिलीपसिंह भोसले, सुदामराव मांढरे व अन्य मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
त्यानंतर नगरपरिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते.शहरातील मलनि:सारण (भूमिगत गटार) योजनेच्या नावाखाली सुमारे १०० कोटी आणि या योजनेची अंमलबजावणी करताना शहरातील रस्त्यांची दुरावस्था करुन त्यासाठीचे १०० कोटी असे २०० कोटी रुपये पाण्यात गेल्याचे निदर्शनास आणून देत, ही योजना कशासाठी आणि कोणासाठी राबविली असा सवाल करीत सदर योजना राबविताना त्यासाठी आवश्यक असलेला एसटीबी प्लांट किंवा त्याच्या उभारणीसाठी जागेचे आरक्षण केल्याचे दिसत नाही.
शहरवासीयांच्या घरातील शौचालय या योजनेला जोडल्याचे दिसत नाही म्हणजे नियोजन शून्य पद्धतीने सदरची योजना राबविली आणि शहरातील करदात्यांच्या खिशातून जमा झालेले शंभर कोटी वाया गेल्याचे निदर्शनास आणून देत या संपूर्ण योजनेची चौकशी करण्याची मागणी माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी केली.
संपूर्ण शहर स्वच्छ झाले पाहिजे..
शहर स्वच्छता अभियानाचा शुभारंभ केल्यानंतर नगर परिषदेने संपूर्ण शहर स्वच्छतेबाबत केलेले नियोजन समजावून घेत प्रामुख्याने शहरातील सर्व प्रभागात स्वच्छता झाली पाहिजे यासाठी आपल्याकडे उपलब्ध स्वच्छता यंत्रणा, कर्मचारी यांच्या २-३ टीम करुन प्रभाग निहाय स्वच्छतेचे नियोजन करा आणि संपूर्ण शहर स्वच्छ झाले पाहिजे या दृष्टीने अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश यावेळी माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी प्रशासनाला दिले.
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने काही भागात मोठ्या प्रमाणावर गवत आणि झाडे उगवली आहेत ती काढून घेतली पाहिजेत त्याचबरोबर साठलेला कचरा उचलून संपूर्ण शहराची स्वच्छता करण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी आ. सचिन पाटील यांनी स्पष्ट केले.मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी शहर स्वच्छतेसंबंधी केलेले नियोजन यावेळी उपस्थितांना सांगितले.
त्यांच्याशी मनोमिलन होणार नाही..
गत विधानसभा निवडणुकीत फलटण तालुक्यात सुमारे ६२ टक्के हून अधिक आणि फलटण शहरात ७० टक्के मतदान लोकांनी विश्वासाने आ. सचिन पाटील यांना दिले आहे. निर्धाराने लोकांनी ज्यांना नाकारले त्यांच्याशी मनोमिलन किंवा युती करणे हा लोकांचा विश्वासघात ठरेल त्यामुळे मनोमिलनाची चर्चा निष्फळ असून सासवड आणि राजाळे येथील जाहीर सभांमधून आपण मनोमिलन होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे .आजही आपण त्या मतावर ठाम असल्याचे स्पष्ट प्रतिपादन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.





