Phaltan Crime – तालुक्यातील शिरढोण गावच्या हद्दीत गोगावलेवाडी रेल्वे गेटजवळील माने वस्ती येथे दिवसाढवळ्या घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पा दशरथ अवघडे (वय ४२, रा. शिरढोण) या आपल्या मुलासह राहतात. त्यांचा मुलगा अजिंक्य हा कुमठे फाटा येथे कलिगंड विक्रीचा स्टॉल चालवतो. रविवार, दि. ९ मार्च रोजी सकाळी तो नेहमीप्रमाणे स्टॉलवर गेला होता. त्यानंतर दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास पुष्पा अवघडे या घराला कुलूप लावून शेळ्या चारण्यासाठी एकसळच्या ओढा शिवारात गेल्या होत्या. दुपारी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या प्रियांका प्रकाश माळी यांनी मोबाइलवर कॉल करून घरातून आवाज येत असल्याची माहिती दिली. त्यानंतर पुष्पा अवघडे घरी परतल्या असता घराचे कुलूप व कडी-कोयंडा तोडलेले दिसले. लोखंडी कपाटातील लॉकर तपासले असता त्यामध्ये ठेवलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरीस गेलेल्या मालामध्ये सुमारे ३ ग्रॅम वजनाची दोन सोन्याची फुले, मंगळसूत्राच्या सुमारे ५ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या वाट्या, ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे जोंधळी मणी तसेच २६ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण सुमारे ३९ हजार रुपयांचा ऐवज असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.