पीएच.डी., एमफिलच्या 800 जागा वाढल्या

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएच.डी. व एमफिल अभ्यासक्रमांच्या नव्याने 90 मार्गदर्शकांची (गाईड) संख्या वाढली आहे. त्यामुळे पीएच.डी. व एमफिलच्या 800 जागा वाढल्या आहेत. त्यामुळे पीएचडी प्रवेश परीक्षेतून पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची संधी मिळणार आहे.
पुणे विद्यापीठाने पीएच.डी. प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षा (पेट) दि. 7 जुलै रोजी घेतली होती. त्यावेळी पीएच.डी. प्रवेशासाठी सुमारे अडीच हजार जागा उपलब्ध होत्या. त्यानुसार “पेट’ परीक्षा घेण्यात आली. दरम्यानच्या काळात विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाने मार्गदर्शकांची नव्याने माहिती मागविली होती. त्यानुसार मार्गदर्शकांनी अर्ज केले. त्यात नव्याने आणखी 90 मार्गदर्शकांची संख्या वाढल्याचे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव उत्तम चव्हाण यांनी सांगितले.
आता पीएच.डी.साठी एकूण 3 हजार 400, तर एमफिलसाठी 260 जागा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे वाढलेल्या जागांवर विद्यार्थ्यांना संधी मिळण्यासाठी विद्यापीठाने प्रवेशाच्या जागा “अपडेट’ करीत आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकणार आहे. “पेट’ परीक्षेतून पीएचडी प्रवेशासाठी 6 हजार 400, तर एमफिल प्रवेशासाठी 460 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे.
दिवाळीनंतर प्रवेश निश्चित
रिसर्च सेंटरने सर्व आवश्यक बाबींची पूर्तता केल्यानंतर त्याच सेंटरवर विद्यार्थ्यांच्या मुलाखती व सादरीकरण होईल. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या मुलाखती होतील. त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड केली जाईल. त्यानंतर विद्यार्थ्यांचा पीएच.डी. व एमफिल अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चिती होईल, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.
विद्यार्थ्यांना रिसर्च सेंटर बदलण्यास मुभा
प्रवेश क्षमता व गाईडची संख्या वाढल्याने, विद्यार्थ्यांना रिसर्च सेंटरही बदलण्याचा पर्याय दिला जाणार आहे. त्याबाबतचे परिपत्रक येत्या आठवडाभरात प्रसिद्ध केले जाणार असून, त्यासाठी लिंकही खुली केली जाईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना ठराविक मुदतीत रिसर्च सेंटर बदलण्यासाठी अर्ज करावेत, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.




