अमेरिकेच्या फिजर कंपनीने लसीच्या वापरासाठी भारताकडे मागितली अनुमती

नवी दिल्ली – अमेरिकेच्या फिजर कंपनीने आपल्या करोना विरोधातील लसीच्या वापरासाठी भारत सरकारकडे अनुमती मागितली आहे. या लसीच्या वापराला ब्रिटनने या आधीच अनुमती दिली आहे. कंपनीच्या वतीने भारताच्या औषध नियंत्रक महासंचालकांकडे रितसर अनुमतीचा अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती संबंधीत सूत्रांनी दिली.
या लसीच्या चाचण्यांचे बाहेरील देशांतील निष्कर्ष अनुकुल आले तर ते तपासून भारतात या लसीच्या वापराला आणिबाणीची बाब म्हणून मान्यता देण्याचा औषध नियंत्रक महासंचालकांचा विचार आहे असेही या सूत्रांनी सांगितले.
जर्मनीची बायोएनटेक आणि अमेरिकेची फिजर या दोन कंपन्यांनी संयुक्तपणे ही लस विकसित केली असून त्याच्या वापराला ब्रिटनने नुकतीच अनुमती दिली आहे. फिजर कंपनीने औषध नियंत्रकांकडे जो अर्ज केला आहे त्यात भारतातील या लसीच्या क्लिनीकल ट्रायल शिवाय ही लस वापरण्यास अनुमती मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.
स्थानिक पातळीवरील क्लिनीकल चाचण्यांशिवाय एखाद्या औषधाला अनुमती देण्याचा अधिकार औषध नियंत्रकांना आहे. अमेरिकन कंपनीच्या या अर्जावर नियमानुसार 90 दिवसांच्या आत निर्णय दिला जाणार आहे.





