सलग 9 दरवाढींमुळे पेट्रोल 5 रुपयांनी महाग
Updated On:

नवी दिल्ली: सार्वजनिक इंधन कंपन्यांनी सोमवारी लिटरमागे पेट्रोलच्या दरात 48 पैशांची तर डिझेलच्या दरात 23 पैशांची वाढ केली. त्यामुळे दोन्ही इंधनांच्या दरवाढीचे सत्र सलग नवव्या दिवशी कायम राहिले. आतापर्यंतच्या सलग दरवाढींमुळे अवघ्या 9 दिवसांत पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 4 रूपये 87 पैशांनी महागले.
आता देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 76 रुपये 26 पैसे, तर डिझेलचा दर 74 रुपये 26 पैसे इतका झाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये दरदिवशी बदल करण्याची प्रक्रिया 82 दिवस स्थगित होती.
ती प्रक्रिया सार्वजनिक कंपन्यांनी 7 जूनपासून सुरू केली. तेव्हापासून दरदिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ झाली आहे. ती दरवाढ देशभरात लागू आहे. मात्र, स्थानिक विक्री कर किंवा मूल्यवर्धित कराच्या (व्हॅट) वेगवेगळ्या आकारणीमुळे राज्याराज्यांतील इंधन दर वेगवेगळे आहेत.





