Petrol-Diesel: आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईच्या वावड्या उठल्याने राज्यातील काही ठिकाणी पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील इंधन स्थिती स्पष्ट करत जनतेला घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. “राज्याकडे पेट्रोल आणि डिझेलचा आवश्यक साठा उपलब्ध असून, नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये,” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मागणी वाढल्याने यंत्रणेवर ताण; काळाबाजार करणाऱ्यांना इशारा- मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने देशात पुरेसा इंधन साठा असल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे. मात्र, सोशल मीडियावरील अफवांमुळे नागरिक गरजेपेक्षा जास्त इंधन भरून घेत आहेत, ज्यामुळे पुरवठा साखळीवर विनाकारण ताण येत आहे. “दरमहा जेवढ्या इंधनाची आवश्यकता असते, तेवढा पुरवठा नियमित सुरू आहे. तरीही कोणी या परिस्थितीचा फायदा घेऊन पेट्रोल-डिझेलचा काळाबाजार करत असेल, तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. हेही वाचा – युद्धामुळे इंधन टंचाईच्या चर्चांवर सरकारने अखेर सोडलं मौन; देशात किती आहे साठा जाणून घ्या रिफायनरी १०० टक्के क्षमतेने सुरू – देशातील सर्व तेल शुद्धीकरण कारखाने (रिफायनरी) सध्या १०० टक्के क्षमतेने कार्यरत आहेत. कच्च्या तेलाचा पुरेसा साठा आपल्याकडे असून पुरवठ्यात कोणतीही तांत्रिक अडचण नाही. त्यामुळे ‘पॅनिक बाइंग’ (घाबरून खरेदी करणे) टाळावे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. प्रशासनाकडून इंधन वितरणावर मर्यादा – दरम्यान, वाढती गर्दी आणि गोंधळ टाळण्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाने इंधन वितरणाचे नियोजन केले आहे. त्यानुसार, दुचाकी वाहनांना एका वेळी २०० रुपयांचे, तर चारचाकी वाहनांना २००० रुपयांचे इंधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही पंपांवर इंधन संपल्याचे फलक केवळ अचानक वाढलेल्या मागणीमुळे लावले गेले असून, तो कायमस्वरूपी तुटवडा नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा आणि संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आले आहे.