Petrol-Diesel: मार्च महिन्याच्या सुरुवातीला तेल शुद्धीकरण करणार्या कंपन्यांच्या नफा बराच उच्च पातळीवर गेला होता. मात्र अचानक खनिज तेल पुरवठा विस्कळीत झाला आहे. अशा परिस्थितीत आता या कंपन्यांना नफ्याऐवजी तोटा होत असल्याची आकडेवारी समोर येत आहे. खनिज तेलाच्या किमती वाढूनही भारतातील सरकारी कंपन्यांनी पेट्रोल, डिझेल आणि इतर इंधनाच्या किमती वाढविलेल्या नाही. अशा परिस्थितीत ग्राहकांना जरी लाभ होत असला तरी या कंपन्यांच्या ताळेबंदावर याचा नकारात्मक परिणाम होणार असल्याचे स्पष्ट दिसून येते. ही तूट एकतर सरकारला भरून काढावी लागणार आहे किंवा नंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करावी लागणार असल्याचे समजले जात आहे. आखातातील खाडीतून ठप्प झालेल्या खनिज तेल पुरवाड्याचा परिणाम सर्वात जास्त दक्षिण आशियातील देशावर झालेला आहे. त्यामध्ये भारताचा समावेश आहे. कारण आखाताच्या खाडीपासून हे देश जवळ आहेत. या देशात आखातातून खनिज तेल आणि नैसर्गिक वायू घेतला जात असतो. यामुळे पाकिस्तान, भारत, बांगलादेश, श्रीलंका, ब्रह्मदेश, व्हिएतनाम, थायलंड, इंडोनेशिया, फिलिपाईन्स इत्यादी देशाच्या ऊर्जा सुरक्षिततेवर संकट आले आहे. हेही वाचा – महाराष्ट्रातील 35 टक्के हॉटेल्स बंद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे साकडे, व्यावसायिकांवर बेकारीची कुऱ्हाड याचा थेट परिणाम तेल शुद्धीकरण कंपन्यावर झाला आहे. पुढील आठवड्यापासून या देशातील महागाईचा दर वेगाने वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फेब्रुवारी महिन्याची महागाईची आकडेवारी नकारात्मक आहे. किती होत आहे तोटा – तेल शुद्धीकरण कंपन्यांना किती नफा मिळतो याचे मूल्यांकन करणारा सिंगापूर ग्रॉस रिफायनिंग मार्जिन हा निर्देशांक आहे. हा निर्देशांक मार्चच्या सुरुवातीला प्रतिपिंप 40 ते 45 डॉलर इतका होता. तो आता उणे 5 ते उणे 10 डॉलर या पातळीवर गेला आहे. एक तर खनिज तेल मिळत नाही आणि या खनिज तेलाचा पुरवठा करणार्या जहाजांचे दर या पंधरवड्यात 842 टक्क्यांनी वाढले आहेत. जहाजाच्या इंधनाचा दरही वाढला आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर महागाई वाढण्याची स्पष्ट लक्षणे दिसून येत आहेत.