Petrol – Diesel: बाटली, डबा किंवा उघड्या भांड्यात पेट्रोल-डिझेल भरून घेणे पडेल महागात; केंद्र सरकारचा कडक इशारा
Petrol - Diesel: नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही डीलर किंवा पेट्रोल पंपाला सोडले जाणार नाही, असे मंत्रालयाने स्पष्ट केले.

Petrol – Diesel: देशात पेट्रोल आणि डिझेलची कोणतीही टंचाई नाही, त्यामुळे घाबरून किंवा असुरक्षित पद्धतीने इंधनाचा साठा करण्याची चूक करू नका, असे पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केले. मंत्रालयाने एक महत्त्वाची सूचना जारी करत नागरिकांना उघड्या भांड्यांमध्ये, बाटल्यांमध्ये किंवा कोणत्याही अयोग्य कंटेनरमध्ये पेट्रोल-डिझेल भरून घेऊ नये, असा इशारा दिला आहे. असे करणे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असून मोठ्या अपघाताची शक्यता असते, असे मंत्रालयाने नमूद केले.
चेन्नईतील घटनेनंतर कारवाई –
तमिळनाडूच्या चेन्नईमध्ये एका पेट्रोल पंपावर ग्राहकाला उघड्या कंटेनरमध्ये पेट्रोल दिले जात असल्याचे आढळले. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित पेट्रोल पंपावर तात्काळ कारवाई करत त्याचे परवाना निलंबित केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही डीलर किंवा पेट्रोल पंपाला सोडले जाणार नाही, असे मंत्रालयाने स्पष्ट केले.
पेट्रोल पंपांवर राहणार कडक नजर –
मंत्रालयाने ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे जनतेला आश्वस्त केले की देशभरातील सर्व पेट्रोल पंपांवर इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. सर्व इंधन विक्रेते व डीलरांना इंधन देताना सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत. उघड्या डब्यांमध्ये तेल विकताना आढळलेल्या कोणत्याही पेट्रोल पंपाविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा सरकारने दिला आहे. नागरिकांनी केवळ आपल्या वाहनांच्या टाकीतच इंधन भरावे आणि घरी तेलाचा साठा करण्यासारखी बेजबाबदार कृती टाळावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.





