एक्झिट पोलचा मुद्दा पोहोचला सर्वोच्च न्यायालयात, शेअर बाजारातील घसरणीच्या चौकशीची मागणी

petition in supreme court – लोकसभा 2024 च्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी 4 जून रोजी शेअर बाजारात अचानक घसरण झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. आता याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये केंद्र सरकार आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांना या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे.
अॅड. विशाल तिवारी यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. याचा एक्झिट पोलशी सखोल संबंध आहे आणि त्याची चौकशी व्हायला हवी.
याचिकाकर्ते म्हणाले, ‘शेअर मार्केटमध्ये अस्थिरता दिसून आली. बातम्यांनुसार, 20 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे नियामक यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याचिकेत म्हटले आहे की, लोकसभेच्या एक्झिट पोलच्या घोषणेनंतर शेअर बाजारात तेजी आली होती, मात्र प्रत्यक्ष निकाल जाहीर झाल्यानंतर बाजार घसरला. त्यामुळे नियामक प्राधिकरण आणि त्याच्या यंत्रणेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. याबाबत चौकशी होण्याची गरज आहे.
राहुल गांधी यांनी याला गुन्हेगारी कृत्य म्हटले –
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी 6 जून रोजी पत्रकार परिषदेत याबाबत गंभीर आरोप केले होते. त्यांनी दावा केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे देशातील कथित सर्वात मोठ्या शेअर बाजार घोटाळ्यात थेट सहभागी होते, ज्यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचे 30 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. हे गुन्हेगारी कृत्य असल्याचे सांगत त्यांनी संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीची मागणी केली होती.




