Pune News : पुणे जिल्ह्यात ड्रोन कॅमेऱ्याच्या वापरासाठी परवानगी बंधनकारक! अपर जिल्हादंडाधिकारी आदेश जारी

Pune News : आजकाल मोठ्या कार्यक्रमांमध्ये आकाशात ड्रोन उडवून त्याद्वारे चित्रीकरण केले जाते. पण आता याबाबात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात कोणत्याही खाजगी कार्यक्रमात ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करताना त्याबाबत माहिती देऊन परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आलं आहे. याबाबतचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी काढले आहेत.
या आदेशनुसार पुणे जिल्ह्यात कोणत्याही खासगी व्यक्ती, कार्यक्रम व्यवस्थापन (इव्हेंट मॅनेजमेंट) व छायाचित्रण करणाऱ्या व्यावसायिकांनी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करताना त्याची पूर्व माहिती सात दिवस अगोदर संबंधित पोलीस ठाण्यात देऊन परवानगी घ्यावी लागणार आहे. पुणे जिल्ह्यात अनेक महत्वाची धार्मिक स्थळे, धरणे, केंद्रीय संस्था असून दहशतवादी कारवायांमध्ये ड्रोन कॅमेऱ्याद्वारे टेहळणी होऊन त्याचा अतिरेकी कारवायांमध्ये उपयोग केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच दौंड, बारामती शिरूर तालुक्यात रात्रीच्या वेळी ड्रोन फिरत असल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. हे प्रतिबंधात्मक आदेश पुढील दोन महिन्यांसाठी लागू राहतील, असं सांगण्यात आलं आहे.





