पुणे जिल्हा | खेडचे प्रश्न सोडविण्यात लोकप्रतिनिधी अपयशी

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – खेड तालुक्यात अनेक प्रश्न, समस्या प्रलंबित असून ते सोडविण्यात विद्यमान लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख यांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे नाव न घेता पत्रकार परिषदेत केली.
अतुल देशमुख म्हणाले, मी 2007 पासून राजकारणात सक्रिय असून तालुक्यातील काही वाईट प्रवृत्ती विरोधात लढा देत आहे. भाजपमध्ये न्याय मिळाला नाही म्हणून शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. तालुक्यातील अनेक गावाचे सदस्य, सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य आणि तालुक्यातील नागरिक, मतदार माझ्यासोबत आहेत. जे 20 वर्षे माझ्यावर विश्वास ठेवत आले आहेत. त्यांना मला न्याय द्यायचा आहे.
देशमुख म्हणाले की, खेड तालुका विकासात जेवढा पुढे जायला पाहिजे त्या पद्धतीने विकास झाला नाही. 15 वर्षांत मोहिते यांनी काही काम केले नाही. एमआयडीसीमध्ये अनेक उणीवा ठेवल्या त्या सोडवण्यासाठी विधिमंडळात आवाज उठवला नाही. ठाम आणि ठोस भूमिका घेतली नाही. चाकण वाहतूक कोंडी सोडवली नाही.
एमआयडीसी चे 7 टप्पे झाले मात्र एमआयडीसीत सेवा सुविधा देण्यात अपयशी ठरले. तालुक्यातील तीनही धरणाचे पाणी वाटपाबाबत विधिमंडळात आवाज उठवला नाही. धरणग्रस्तांचे पुनर्वसन रखडलं त्यासाठी आवाज उठवला नाही डावा कालवा अस्तरीकरण, हेड टू टेल, टेल टू हेड काळयावला पाणी सोडण्याबाबत निर्णय घेतला नाही.
खेडचा पूर्व भाग तीन धरणे असूनही आजही तहानलेला आहे. स्थानिकांना रोजगार नाही. याबाबत काहीच उपाययोजना केल्या नाहीत. सेझ परतावा धारकांना सुविधा मिळत नाहीत विमानतळ गेले ते थांबवण्यासाठी का प्रयत्न झाले नाहीत. कांदा बटाटा संशोधन केंद्र आहे त्यावर काही काम झाले नाही. कंपनीत स्थानिकांना काम मिळाले नाही, हे प्रश्न सोडविण्यात मोहिते पाटील अपयशी ठरले असल्याचे देशमुख यांनी नमूद केले.
या प्रश्नांचा केला ऊहापोह
शेतकर्यांना आरोग्य सुविधा मिळत नाहीत,
पुनर्वसनाची जमीन शेतकर्यांना मिळत नाही
शेतकर्यांच्या जमिनी कमी भावाने विकली जात आहे
एजंटगिरी वाढली आहे
खेड तालुक्यात अधिकार्याला पैसे देवून काम करून घ्यावे लागते
भ्रष्टाचार करणारे अधिकारी खेड तालुक्यात आले आहेत
अनेक गावांत अजूनही पायाभूत सुविधा नाहीत
महिलांना रोजगार नाही
आदिवासी भागात काहीच रोजगार नाहीत
रोजगार प्रशिक्षण नाही कधी त्यांना प्रोत्साहन दिले
विजेचे प्रश्न गंभीर आहेत अजूनही आपण 32 केव्हीवर आहे
आरोग्याच्या सुविधा नाहीत
विधानसभेसाठी मी उमेदवार
शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला; मात्र उमेदवारी संदर्भात त्यांनी कोणताही शब्द दिला नाही. पक्षाकडे मी तिकीट मागणार असून येत्या विधानसभेत मी उमेदवार आहे. माझे काम पाहून शरद पवार हे मला तिकीट देतील असा विश्वास आहे. मला तिकीट नाही मिळाले तरी महविकास आघाडी जो उमेदवार देईल त्याचे प्रामाणिकपणे काम करील.





