मुंबई : विधानसभा निवडणुकीपासून महायुती भुलभुलय्या सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या आडून जनतेच्या स्वप्नांचा चुराडा केला, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे) उपनेत्या, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी हल्लाबोल केला. दरम्यान, सरकारला जाब विचारण्यासाठी शिवसेनेच्या (ठाकरे) महिला आघाडी जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी दुपारी ३ वाजता वांद्रे येथे धडक देतील, असा इशारा पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत पात्र महिलांना १५०० रुपये महिना देणार असल्याचे जाहीर केले. तसेच ऐन निवडणुकीच्या काळात दीड हजार रुपयांवरून २१०० रुपये देणार, अशी घोषणा केली. मात्र, सत्तेत येताच कायद्यावर बोट ठेवत, लाडक्या बहिणींची फसवणूक केली जात आहे. सरकारकडून लाडक्या बहिणींची झालेल्या फसवणुकीबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी शिवसेनेच्या (ठाकरे) रणरागिणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देतील, असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.