“जे लोक जसे आहेत तसं…” ; मणिपूर घटनेवरून प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला संताप

मुंबई : हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील दोन महिलांना रस्त्यावर नग्नावस्थेत उतरवल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर आलेल्या बातम्यांनुसार, जमावाने त्या दोघींची संपूर्ण परिसरात नग्न धिंड काढली. शिवाय या दोघींवर सामूहिक बलात्कारही झाल्याची बातमी आहे. सामूहिक बलात्कार, धिंड काढणे आणि मारहाणीनंतर या महिलांना बोलताही येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकाराने देश हादरला असून मणिपूर हिंसाचाराच्या घटनांना आता पूर्णपणे वेगळे वळण लागले असून सर्व राजकीय पक्षांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. या संपूर्ण प्रकरणावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी संताप व्यक्त केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी यासंदर्भात एक ट्वीट केले आहे. या ट्विटमध्ये, “मणिपूरमध्ये घडणाऱ्या घटना नवीन नाहीत. या अगोदरही अशा घटना घडलेल्या आहेत. त्याविरोधात मणिपूरच्या महिलांनी सैन्याच्या ऑफिसवर नग्न मोर्चा काढला होता. शासन भाजपचे असो वा इतर कोणाचे, उत्तर पूर्वेच्या राज्यांची विशेष परिस्थिती लक्षात न घेता स्वतःचा मनमानी कारभार राबवल्यामुळे हा उद्रेक होतो आहे. सरकारला आम्ही मागेही इशारा दिला होता आज पुन्हा देतोय, उत्तर पूर्वेला तिबेट आणि अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमांवर चीन वसाहती तयार करतोय. हा धोका आहे. जे लोक जसे आहेत तसं स्वीकारायला आपण शिकलं पाहिजे. आपली संस्कृती इतरांवर लादणं बंद झालं तर संपूर्ण उत्तर पूर्व, सेव्हन सिस्टर्स अँड वन ब्रदर येथे शांतता नांदेल आणि ते भारताबरोबर रहातील अशी परिस्थिती आहे”, असं ट्वटी प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे.
मनीपुरमध्ये घडणाऱ्या घटना नवीन नाहीत. या अगोदर ही अशा घटना घडलेल्या आहेत.
त्याविरोधात मनीपुरच्या महिलांनी सैन्याच्या ऑफिसवर नग्न मोर्चा काढला होता. शासन भाजपचे असो वा इतर कोणाचे, उत्तर पूर्वेच्या राज्यांची विशेष परिस्थिती लक्षात न घेता स्वतःचा मनमानी कारभार राबवल्यामुळे हा उद्रेक…
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 21, 2023
बुधवारी रात्री सोशल मीडियावर मणिपूरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला; ज्यामध्ये पुरुषांचा एक मोठा गट दोन महिलांची रस्त्यावरून निर्वस्त्र धिंड काढत असल्याचे दिसत होते. त्यानंतर या महिलांना एका शेताच्या दिशेने घेऊन जाताना व्हिडीओत दिसत आहे. त्या ठिकाणी या महिलांवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप आदिवासी संघटनांनी केला आहे. ही घटना ४ मे रोजी थौबल जिल्ह्यात घडली असून, पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
१८ मे रोजी खांगपोकी जिल्ह्यात पोलिसांनी शून्य एफआयआर (शून्य एफआयआर म्हणजे ज्या ठिकाणी घटना घडली, ते सोडून दुसरीकडे एफआयआर दाखल करणे) दाखल केला. पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार व हत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, या अमानवी गुन्ह्याला दोन महिने उलटूनही आरोपींना अद्याप अटक झालेली नाही.





