Devendra Fadnavis : “जनतेने राहुल गांधींना नाकारले, आणि त्याचा बदला…”; मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान

Devendra Fadnavis | Rahul Gandhi – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेविषयी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यावर निवडणूक आयोग उत्तर देईलच. पण, मुख्य प्रश्न आहे तो लोकशाही प्रक्रिया आणि जनादेशाचा सातत्याने अपमान करण्याचा. जनतेने राहुल यांना नाकारले. त्याचा बदला म्हणून ते जनतेला नाकारत आहेत. यातून कॉंग्रेस पक्ष आणखी गर्तेत जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
राहुल यांचा एक लेख नुकताच काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाला. त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रात मागील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत मॅच-फिक्सिंग झाल्याचा आरोप केला. संबंधित मॅच-फिक्सिंगची पुनरावृत्ती बिहारमधील आगामी निवडणुकीत होऊ शकेल. भाजपचा पराभव निश्चित असणाऱ्या इतर राज्यांतही तसे घडेल, असे भाकितही त्यांनी केले. राहुल यांनी केलेल्या आरोपांना, टीकेला फडणवीस यांनी लेखातूनच प्रत्युत्तर दिले.
महाराष्ट्रातील निवडणूक म्हणजे लोकशाहीतील गडबडीची ब्लू प्रिंट होती. ते कारस्थान ५ टप्प्यांमध्ये रचण्यात आले. निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीवर कब्जा, मतदारयाद्यांमध्ये बोगस मतदारांचा समावेश, मतदानाची टक्केवारी फुगवणे, भाजपला विजय मिळवून देण्याच्या ठिकाणी बोगस मतदान आणि पुरावे लपवणे हे ते टप्पे असल्याची भूमिका राहुल यांनी मांडली. त्या भूमिकेचाही समाचार फडणवीस यांनी घेतला.
राहुल उपस्थित करत असलेला विषय आता जुना झाला आहे. त्यावर निवडणूक आयोगाने वेळोवेळी उत्तरेही दिली. तरीही राहुल यांना मी एक न मागितलेला सल्ला देतो. त्यांनी पराभव स्वीकारून आपण कुठे चुकतो आहोत, जनतेशी आपला कनेक्ट कुठे कमी पडतो, त्यासाठी काय केले पाहिजे याचा विचार करावा.
एखादी गोष्ट जनतेला पटवून देता येत नसेल; तर त्यांच्यात संभ्रम निर्माण करा असे एक तत्व आहे. त्याचाच अवलंब राहुल वारंवार करत आहेत. बिहारसह आगामी विधानसभा निवडणुकांच्या पराभवाची कारणे ते आतापासूनच निश्चित करत आहेत, असा शाब्दिक टोलाही फडणवीस यांनी लगावला.
केंद्रात कॉंग्रेसची सत्ता असताना सरकारनेच मुख्य निवडणूक आयुक्त थेट नियुक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच विरोधी पक्षनेत्याचा समावेश असलेल्या समितीची व्यवस्था तशा नियुक्तीसाठी केली. पण, लोकशाहीला भक्कम करणारे पाऊल राहुल यांना आवडलेले दिसत नाही. त्यांनी बोगस मतदार असा उल्लेख करून मतदार संख्या वाढीवर आक्षेप घेतला.
युवा मतदारांची संख्या ही सातत्याने वाढत असते. त्यामुळे मतदार संख्या वाढीत अजिबात काहीतरी दिव्य घडलेले नाही. मतदानाची टक्केवारी फुगवल्याचा दावा तर फार मोठा विनोद आहे. मतदान संपण्याआधी मतदान केंद्रांवर आलेल्यांना निर्धारित वेळेनंतरही मतदानाचा हक्क बजावता येतो, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.
मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतरही महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी वाढतच राहिली. अतिरिक्त मतदान झालेल्या बहुतांश ठिकाणी भाजप आणि मित्रपक्षांचा विजय झाला, असा दावा राहुल यांनी केला. तो आणखीच हास्यास्पद आहे.
त्यांनी कामठीचे उदाहरण दिले. पण, १८ टक्के मतदान वाढ झालेल्या माढ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्ष जिंकला. वणीत (१३ टक्के वाढ) उद्धवसेनेला, तर श्रीरामपूरमध्ये (१२ टक्के वाढ) कॉंग्रेसला विजय मिळाला, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
सातत्याने लोकशाही प्रक्रियेवर आणि घटनात्मक संस्थांवर शंका घेऊन आपण देशाला कोणत्या दिशेने घेऊन जात आहोत, कोणते विष कालवत आहोत याचे भान ठेवावे, असा पलटवारही फडणवीस यांनी केला. मॅच-फिक्सिंग झालेल्या निवडणुका लोकशाहीसाठी विषासारख्या आहेत, असे भाष्य राहुल यांनी केले होते. त्यावर फडणवीस यांनी संबंधित उत्तर दिले.





