पुणेकरांनो, बिनधास्ता मांडा तुमच्या तक्रारी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरातील दैनंदिन कामेही रखडत असल्याने नागरिकांना महापालिकेचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. त्यानंतरही अनेक विभागप्रमुख तक्रारींची दखलही घेत नाहीत. त्यामुळे नागरिक थेट आयुक्तांकडेच गर्दी करत आहेत.
त्यामुळे नागरिकांना आपल्या तक्रारी थेट आयुक्त स्तरावर मांडण्यासाठी महापालिकेत तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आला आहे. प्रत्येक सोमवार आणि गुरुवारी दुपारी साडेतीन ते साडेपाच या वेळेत नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडता येणार आहे.
या कक्षाची जबाबदारी परिमंडळ दोनचे उपायुक्त अविनाश सकपाळ यांच्याकडे आहे. महापालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले यांनी नुकतेच याबाबतचे आदेश काढले आहे. महापालिका मुख्य इमारतीत चौथ्या आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात हा तक्रार निवारण कक्ष असेल.
महापालिकेचे काही विभाग प्रमुख, क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी तसेच परिमंडळ उपायुक्त या ठिकाणी ठरलेल्या दिवशी उपस्थित राहून नागरिकांची निवेदने घेतील. तसेच संबंधित विभागांना पाठवतील.
त्यानंतरही नागरिकांना तक्रार मांडायची असल्यास त्याचे गांभीर्य आणि स्वरूप लक्षात घेऊन ती अतिरिक्त आयुक्तांकडे मांडली जाईल. त्यावरही तक्रारीची सोडवणूक न झाल्यास नागरिकांना आयुक्तांनाही भेटता येईल.
सपकाळ यांच्यासह, पाणी पुरवठा, मलनि:सारण, पथ विभाग, बांधकाम विकास विभाग, तसेच अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता आणि तीन प्रशासकीय अधिकारी असणार आहे. या सर्वांनी या दोन्ही दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे.
असे असेल कामकाज
आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार संबधित अधिकारी नेमून दिलेल्या दिवशी तक्रार नोंदवून घेतील, त्यानंतर त्यावर प्रत्यक्ष लगेच सुनावणी घेऊन आवश्यक त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन निरस्त करतील.
त्याबाबतचा पाठपुरावा घेऊन तक्ररदारास माहिती देतील. त्यानंतरही तक्रार निरस्त न झाल्यास अशा तक्रारींचा अहवाल १५ दिवसांनी अतिरिक्त आयुक्तांना सादर करतील.
अतिरिक्त आयुक्त तक्रारदाराची सुनावणी घेतील. सार्वजनिक स्वरुपाच्या अथवा धोरणात्मक बाबीच्या तक्रारी असल्यास त्या आयुक्तांकडे सादर केल्या जातील. त्यावर आयुक्त त्यात सुनावणी घेतील.




