PCMC Samvidhan Bhavan : पिंपरी-चिंचवडमध्ये होणार देशातील पहिले संविधान भवन; जगभरातील राज्यघटनांचा अभ्यास करता येणार

PCMC Samvidhan Bhavan – भारतीय लोकशाहीचा पाया असलेल्या संविधान तथा राज्यघटनेचा अभ्यास, प्रचार-प्रसार व्हावा या करिता देशातील पहिले संविधान भवन महाराष्ट्रामध्ये उभारले जाणार आहे. विशेष म्हणजे पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये हे संविधान भवन उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी जगभरातील राज्यघटनांचा अभ्यास करता येणार आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून आणि भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून संविधान भवन उभारले जात आहे. पीएमआरडीएच्या हद्दीतील सुमारे ६ एकर जागा त्यासाठी महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरीत केली आहे. त्याठिकाणी पहिल्या टप्पात २.५ कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात ११७ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.
वास्तविक, राज्य शासनाने पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या हद्दीमध्ये संविधान भवन व विपश्यना केंद्र उभारण्याचे प्रस्तावित होते. २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार प्राधिकरणाचे तत्कालीन अध्यक्ष सदाशीव खाडे व आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने संविधान भवन व विपश्यना केंद्र प्रस्तावित करण्यात आले. मात्र, महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात हा मुद्दा बाजुला पडला.
दरम्यान, राज्यात २०२२ मध्ये महायुती सरकारची स्थापना झाली. त्यांनी आमदार महेश लांडगे यांनी संविधान भवनाबाबत सरकारकडे पाठपुरावा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून संविधान भवनाची जागा पीएमआरडीएकडे हस्तांतरित करण्यात आली. तसेच, संविधान भवनासाठी निधीची तरतूद करावी आणि महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून संविधान भवन उभारावे, या मागणीला मूर्तरुप देण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेवून आम्ही संविधान भवन उभारणीसाठी पुढाकार घेतला. त्यासाठी महापालिका, पीएमआरडीए आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले आहे. संविधान भवनात आंतरराष्ट्रीय दर्जाची लायब्ररी उभारण्याचा संकल्प आहे. देशातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात येत आहे.
– महेश लांडगे, आमदार,





