PCMC News: खड्डे बुजवले की निधी जिरवला? महापालिकेच्या दाव्यांमागचं धक्कादायक सत्य उघड
PCMC News: महापालिकेचा १६०९ खड्डे बुजवल्याचा दावा; मात्र शहरात खड्ड्यांची दुरवस्था कायम असल्याने दीडशे कोटींच्या निधीच्या चौकशीची नागरिकांकडून मागणी.

PCMC News – पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मोहीम महापालिकेच्या स्थापत्य विभागामार्फत वेगाने सुरू असल्याचा दावा केला जात आहे. त्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र ही मोहीम कागदावर असून शहरातील रस्त्यांवर असंख्य खड्डे पडलेले आहेत. विशेष म्हणजे हे खड्डे बुजविण्यासाठी चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात तब्बल १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
असे असतानाही शहराती रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. हे दीडशे कोटी नेमके गेले कुठे याची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासनाने दीड हजारांहून अधिक खड्डे बुजविल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, शहरातील रस्ते खड्ड्यांनी भरले असून त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
महापालिकेच्या स्थापत्य विभागामार्फत शहरातील विविध रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्ती केली जाते. खड्ड्यांबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे पथक त्या ठिकाणी जाऊन पाहणी करते. खड्ड्याचा आकार, खोली, रस्त्याची स्थिती, वाहतुकीची वर्दळ आणि पावसाची परिस्थिती याचा विचार करून दुरुस्तीसाठी योग्य साहित्य निवडले जाते. त्यानंतर खड्डा बुजवून कामाची नोंद केली जाते.
शहरातील वाढत्या तक्रारींची नोंद घेत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहरातील सर्व खड्डे तातडीने बुजविण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले होते. त्यावर प्रशासनाने १६०९ खड्डे बुजविल्याचा दावा केला असून यासाठी मोहीम हाती घेतली असल्याचाही दावा केला आहे. यामध्ये तक्रार प्राप्त झाल्यानंतर ठिकाणाची पाहणी, खड्ड्याची स्थिती तपासणी,
योग्य साहित्याची निवड, खड्डा बुजविणे, कामाची पाहणी व नोंद अशा पद्धतीने ही कार्यवाही केली जात आहे. आतापर्यंत बुजविण्यात आलेल्या १,६०९ खड्ड्यांपैकी ५५६ खड्डे कोल्ड मिक्स, २३ बीबीएम, ७५४ जीएसबी, १२० पेव्हिंग ब्लॉक आणि १५६ खड्डे काँक्रिटच्या माध्यमातून बुजविण्यात आले असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
निधी ठेकेदाराच्या खिशात जिरला?
पिंपरी-चिंचवडकरांच्या टॅक्स रुपी करातून जमा झालेल्या पैशांची कशी उधळपट्टी होते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. महापालिकेच्या चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात शहरातील रस्ते दुरुस्ती, डांबरीकरण आणि खड्डे बुजवण्यासाठी तब्बल १५० कोटी रुपयांची घसघशीत तरतूद करण्यात आली आहे.
१५० कोटींचा निधी मंजूर असतानाही शहरातील रस्त्यांची अवस्था दयनी आहे. एवढा मोठा निधी उपलब्ध असताना शहरात दर्जेदार रस्ते का तयार होऊ शकले नाहीत? हा १५० कोटींचा निधी रस्त्यांवर खर्च झाला की कंत्राटदारांच्या खिशात जिरला, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
“रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याबाबत संबंधित यंत्रणांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. प्राप्त तक्रारींचे वेळेत निराकरण करण्याची जबाबदारी संबंधित कार्यकारी अभियंत्यांची आहे. विभागप्रमुखांनी या कामावर नियमित नियंत्रण ठेवण्याबाबत तसेच तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अभियंत्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई प्रस्तावित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.”
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका





