PCMC News : पिंपरी-चिंचवडला मिळाले नवे कारभारी! डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार
PCMC News : प्रशासकीय कामाचा वेग वाढवण्याचा आणि नागरी सुविधा अधिक दर्जेदार करण्याचा नव्या आयुक्तांचा निर्धार.

PCMC News – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार डॉ. विजय नामदेव सूर्यवंशी यांनी सोमवारी (दि. १६) मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून स्वीकारला. यावेळी महापौर रवि लांडगे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह नगरसेवक संदीप कस्पटे, बाबासाहेब त्रिभुवन आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांनी डॉ. सूर्यवंशी यांचे स्वागत केले.
यावेळी महापौर रवि लांडगे, मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यात शहरातील विविध विकास प्रकल्प, नागरी सुविधा आणि महापालिकेच्या सुरू असलेल्या कामकाजाबाबत सविस्तर चर्चा झाली. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांची गती कायम ठेवणे.
नागरिकांना अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणे तसेच प्रशासनाचे कामकाज अधिक प्रभावी आणि गतिमान करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच नवीन आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. सूर्यवंशी यांनी महापालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेत शहराच्या विकासासाठी प्रशासनाच्या माध्यमातून समन्वयाने आणि प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.




