PCMC News : राष्ट्रवादीची माघार अन् भाजपाची बाजी! महापालिकेत बिनविरोध सत्तेचा फॉर्म्युला; पाहा सभागृहात काय घडलं?
PCMC News : पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भाजपचे रवि लांडगे महापौर तर शर्मिला बाबर यांची उपमहापौर म्हणून बिनविरोध निवड झाली.

PCMC News – पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भाजपचे रवि लांडगे महापौर तर शर्मिला बाबर यांची उपमहापौर म्हणून शुक्रवारी (दि. ६) बिनविरोध निवड झाली. पीठासीन अधिकारी तथा सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी याबाबतची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली काळभोर यांनी उमपहापौरपदाचा अर्ज मागे घेतल्याने बाबर यांची देखील बिनविरोध निवड झाली.
त्यानुसार आता चार वर्ष सुरू असलेली प्रशासकीय राजवट संपुष्टात आली असून भाजपचा सत्ताकाळ सुरू झाला आहे.तब्बल चार वर्षांनंतर शुक्रवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा सकाळी अकरा वाजता सुरू झाली. नवनिर्वाचित नगरसेवकांंचे नगरसचिव कार्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर सकाळी ठीक अकरा वाजता पीठासीन अधिकारी दीपक तावरे सभागृहात आले.
त्यांच्यासोबत आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसचिव मुकेश कोळप आले. नगरसचिव कोळप यांनी सभेचे कामकाज सुरू केले. पीठासीन अधिकाऱ्यांनी महापौर पदासाठी रवी लांडगे यांचा एकमेव अर्ज आला असून तो वैद्य ठरला असल्याचे जाहीर केले. तसेच अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी दिला.
त्या कालावधीत अर्ज मागे न घेतल्याने तसेच कोणीही आक्षेप न घेतल्याने रवी लांडगे यांची महापौर पदावर बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर उपमहापौर पदासाठी भाजपकडून शर्मिला बाबर व राष्ट्रवादीकडून वैशाली काळभोर यांचा अर्ज आला असून तो वैद्य असल्याचे पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केले. तसेच अर्ज माघारी घेण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ देण्यात आला.
या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली काळभोर यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे उपमहापौर पदावर शर्मिला बाबर यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर पीठासीन अधिकारी तावरे यांनी महापौर व उमपहापौर यांचा सत्कार करत महापालिका सभागृहाची सूत्रे त्यांच्याकडे दिली.नवनिर्वाचित महापौर रवी लांडगे यांनी महापालिका सभागृहाचे कामकाज सुरू करण्याचे आदेश दिले.
त्यानंतर विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी दिवंगत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रस्ताव मांडला. सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी देखील श्रद्धांजलीपर भाषणात अजितदादांच्या कार्याचा उल्लेख केला. त्यानंतर दोन मिनिट स्तब्ध उभे राहून अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी सर्वसाधारण सभा २० फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानुसार, महापौर रवी लांडगे यांनी २० फेब्रुवारीपर्यंत सभेचे कामकाज तहकूब केले.
आमदारांकडून सत्कार
महापौर व उपमहापौरांची निवड झाल्यानंतर आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, उमा खापरे यांनी महापालिकेच्या सभागृहात येत नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांचा संविधानाची प्रत देत सत्कार केला.
विरोधी पक्षनेते, सत्तारुढ पक्षनेत्यांची घोषणा
सभेचे कामकाज चालू असताना महापौर लांडगे यांनी सत्तारुढ पक्षनेते म्हणून प्रशांत शितोळे यांच्या नावाची घोषणा केली. तसेच विरोधी पक्षनेते म्हणून भाऊसाहेब भोईर यांच्या नावाची देखील घोषणा केली.






