प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून स्वयंचलित वाहनाने रस्त्यावर पडलेले खड्डे, खराब रस्ते आणि तुटलेल्या पदपथाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. पावसाळा संपूनही शहराच्या विविध भागांत साडे तीनशेहून अधिक खड्डे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिकेकडून हे सर्वेक्षण महिनाभरात पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर खराब रस्ते, खड्डे व पदपथ दुरुस्तीसाठी स्वतंत्र आर्थिक नियोजन करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना शहर खड्डेमुक्त होण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न सोडवणे, खराब रस्ते दुरुस्तीसाठी महापालिका रस्ते सर्वेक्षण आणि देखभाल उपक्रम राबवित आहे. रस्त्यांच्या स्थितीचे मूल्यांकन हे खड्डे असलेले परिसर ओळखण्यास आणि रस्त्यांच्या आवश्यक दुरुस्तीला प्राधान्य देण्यास उपयुक्त ठरणार आहे. महापालिकेकडून स्वयंचलित वाहनाने रस्त्यावरील खड्ड्यांचा शोध घेत दुरुस्ती केली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने जीआयएस या प्रणालीचा आधार घेतला आहे. हे काम सलग तीन वर्षे सुरु राहणार आहे. त्यामुळे शहर खड्डेमुक्त करण्याचा संकल्प महापालिकेने केला आहे. पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर मोठे खड्डे पडतात. वाहतूक संथ होऊन कोंडीत भर पडते. या खड्ड्याने महापालिका प्रशासनावर प्रचंड टीका होते. त्यामुळे महापालिकेने नवीन तंत्रज्ञानावर आधारित सर्व्हेक्षण हाती घेतले आहे. या स्वयंचलित तंत्रज्ञानाद्वारे (ऑटोमेटेड टेक्नॉलॉजी) एकत्रित केलेली रस्त्यांची माहिती महापालिकेच्या भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) प्लॅटफॉर्ममध्ये संकलित केली जाते. या माहितीद्वारे सततची खड्डे दुरुस्ती टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असून रस्त्यांची एकूण गुणवत्ता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. सतराशे किमीचे रस्ते शहरात सुमारे १ हजार ७०० किलोमीटर लांबीचे क्रॉंक्रिट व डांबरी रस्ते आहेत. या रस्त्यांची प्रत्यक्ष तपासणी, संरचनात्मक मूल्यांकन द्वारे (स्ट्रक्चरल असेसमेंट) खड्डे दुरुस्ती कामांच्या गुणवत्ता वाढीला प्राधान्य दिले जाणार आहे. रस्ते दुरुस्ती आणि सुधारणा करणे, महापालिकेच्या अंदाजपत्रकाचे नियोजन करण्यासाठी नोव्हेंबर २०२५ मध्ये पहिला अहवाल सादर करण्यात येईल. ॲप द्वारे राहणार देखरेख सर्वेक्षणाचा एक भाग म्हणून रस्ता खचणे, खड्डा पडणे, तसेच भेगा पडणे यांसारख्या प्रमुख समस्यांची नोंद केली जाईल. वार्षिक देखभाल अहवाल तयार करण्यासाठी तसेच खड्डे दुरुस्तीच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी जीआयएस-आधारित ॲपदेखील विकसित केले आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी सततची होणारी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे टाळण्यास मदत होईल. “शहरातील रस्त्यावर खड्डे पडू नयेत, वारंवार रस्ता खराब होऊ नये. फुटपाथ दुरुस्ती व देखभालीवर अनावश्यक खर्च होवू नये. यासाठी सर्वेक्षणातून सर्व समस्यांची नोंद केली जाईल. वार्षिक देखभाल अहवाल तयार करण्यासाठी तसेच खड्डे दुरुस्तीच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी जीआयएस-आधारित ॲपही विकसित केले आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी सततची होणारी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे टाळता येणार आहेत.” – मकरंद निकम, शहर अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका