PCMC News – पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये प्रभारी आयुक्त म्हणून मेट्रोचे श्रावण हर्डीकर यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. सुरूवातीला निवडणुकीचे कामकाज असेपर्यंत त्यांच्याकडे तात्पुरता पदभार असेल त्यानंतर महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळेल असे सांगण्यात येत होते. मात्र, आता निवडणूक होऊन महापालिकेमध्ये सभागृह अस्तित्वात आले आहे. असे असतानाही अद्याप महापालिका पूर्णवेळ आयुक्तांच्या प्रतिक्षेत आहे. महापालिका आयुक्तपदावरून शेखर सिंह यांची राज्य शासनाने बदली केली. त्यांच्याकडे नाशिक कुंभमेळ्याची जबाबदारी सोपविल्यानंतर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे महापालिकेच्या आयुक्तपदाचा तात्पुरता पदभार देण्यात आला आहे. त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यानंतर महापौर व उपमहापौरांची निवड होऊन महापालिकेचे सभागृह अस्तित्वात आले आहे. असे असतानाही अद्याप महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळाले नसल्याने कामकाज ठप्प आहे. तसेच विकासकामांवर विपरित परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. शेखर सिंह आयुक्त व प्रशासक असताना त्यांच्या कार्यकाळातील अनेक विकासकामे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. अनेक निविदांबाबत देखील आक्षेप घेण्यात आले आहेत. नगरसेवक व राजकीय पदाधिकारी आल्यानंतर झालेल्या चुकीच्या कामांना तोंड द्यावे लागू नये यामुळे अनेक अधिकारी बदली करून घेण्याच्या मूडमध्ये आहेत. दरम्यान, शहरात अनेक महत्वाच्या नागरी समस्या प्रलंबित असून त्यावर तातडीने निर्णय होणे आवश्यक आहे. पूर्णवेळ आयुक्त नसल्याने या प्रश्नांकडे अपेक्षित तसे लक्ष दिले जात नाही. प्रशासकीय राजवट संपल्यानंतर शहराच्या विकासाला वेग देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पूर्णवेळ आयुक्त नसल्याने प्रशासनाला ठोस दिशा मिळत नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराला तातडीने कायमस्वरुपी आयुक्त देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. एकाच वेळी दोन जबाबदाऱ्या आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे एकाच वेळी मेट्रो आणि महापालिका अशा दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. त्यातही आठवड्यातून एक ते दोनच दिवस आयुक्त महापालिकेत असतात. त्यामुळे ते नागरिकांना तर भेटत नसल्याची तक्रार आहे. शिवाय, महापालिकेतील नवीन विकासकामांना मंजुरी, अंदाजपत्रक, निविदा आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये विलंब होत असल्याची तक्रार आहे. सारथी तसेच महापालिकेची अंतर्गत डीएमएस संगणकीय प्रणाली बंद असल्याने फाइल्सचा निपटारा वेळेत होत नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेचे कामकाज ठप्प असून नवनिर्वाचित नगरसेवक देखील पूर्णवेळ आयुक्तांच्या प्रतिक्षेत आहेत. कोणाच्या नावाची चर्चा दरम्यान, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर देखील दोन्हीकडचा कारभार असल्याने महापालिकेचे कामकाज करण्यास तयार नाही. त्यांची बदली झाल्यानंतर नवीन महापालिका आयुक्त कोण येणार याबाबत महापालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले असून नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर यांच्या नावाची चर्चा आहे.