PCMC News – राज्य शासनाच्या सूचनेनुसार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चिखली येथील म्हेत्रेवाडी शाळा क्र. ९३ येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने गुढीपाडवा पट वाढवा या विशेष प्रवेश अभियानाचा शुभारंभ आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते गुरूवारी (दि. १९) करण्यात आला. यावेळी नव्याने शाळेत शाळेत प्रवेश घेऊन आपल्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षण समिती सभापती रविना अंगोळकर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, नगरसेवक यश साने, नगरसेविका रिटा सानप, प्रियंका कुदळे, सचिन सानप, शिक्षण विभागाच्या उप आयुक्त ममता शिंदे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, मुख्याध्यापिका स्नेहल मोरे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह शाळेतील शिक्षिका, कर्मचारी आणि विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थिनींनी योगाच्या माध्यमातून सादर केलेली गणेश वंदना विशेष आकर्षण ठरली. सातवी व आठवीतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या योगनृत्याने उपस्थितांची मनं जिंकली. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी तसेच उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या या उत्कृष्ट सादरीकरणाचे कौतुक केले. गुढीपाडवा पट वाढवा अभियान, चिखली आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, ‘गुढीपाडवा – पट वाढवा’ हे अभियान केवळ प्रवेश वाढविण्यापुरता मर्यादित नसून, प्रत्येक मुलापर्यंत दर्जेदार आणि सर्वसमावेशक शिक्षण पोहोचविण्याचा एक व्यापक प्रयत्न आहे. महापालिका शाळांमधील आधुनिक सुविधा, समर्पित शिक्षकवर्ग आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रम यांच्या बळावर शिक्षणाची भक्कम पायाभरणी होत आहे. त्यामुळे अधिकाधिक पालकांनी या गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्थेवर विश्वास ठेवून आपल्या पाल्यांचा महापालिका शाळांमध्ये प्रवेश घ्यावा, तसेच या शैक्षणिक चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवावा. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यावर अधिक भर दिल्यास निश्चितच पटसंख्या वाढण्यास मदत होईल. माझ्या स्वतःच्या शालेय जीवनात मला ६ ते ८ रुपयांची शिष्यवृत्ती मिळायची. त्या छोट्याशा रकमेनेही शिक्षणाबद्दलची प्रेरणा वाढत असे. त्यामुळे अशा योजनांचा विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम होतो, यावर माझा ठाम विश्वास आहे.