PCMC News – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीवर लेखा विभागातील मुख्य अधिकारी आणि ठेकेदारांनी मिळून दरोडा टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण महाघोटाळ्याचे मुख्य सूत्रधार महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन असल्याचा गंभीर आरोप स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी बुधवारी (दि. ८) पत्रकार परिषदेत केला. जैन यांनी सर्व प्रशासकीय नियम धाब्यावर बसवून ५२ कोटींहून अधिक रकमेची बिले ठेकेदारांना परस्पर अदा केली असल्याचे बारणे यांनी सांगितले. सन २०२६-२७ चे अंदाजपत्रक नुकतेच मंजूर करण्यात आले आहे. या अंदाजपत्रकामध्ये काही कामांचा समावेश नसताना सुमारे ७० हून अधिक कामांची बिले रात्रीतून काढण्यात आली. यामध्ये स्थापत्य व पाणीपुरवठा विभागाच्या कामांचा सर्वाधिक समावेश आहे. विशेष म्हणजे या संबंधित विभागाच्या विभागप्रमुखांना याची पुसटशी देखील कल्पना नसल्याचे समोर आले आहे. मुख्य लेखा अधिकारी प्रवीण जैन यांनी ठेकेदारांची दिशाभूल करत दोन नगरसेवकांच्या सह्या आणल्या तरच बिल मिळेल अशी अट घातली होती. ठेकेदारांनी देखील तुमच्या प्रभागातील काम असून ते लवकर पूर्ण करण्यासाठी सह्या द्या अशी विनवणी नगरसेवकांना केली. त्यानुसार सुमारे ७० विविध कामांवर २० नगरसेवकांनी सह्या केल्या आहेत. त्यामध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांचा समावेश आहे. स्थायी समितीचे सभापती बारणे यांनी संबंधित नगरसेवकांना विचारले असता आमच्या प्रभागातील काम असल्याने आम्ही सह्या केल्या बाकी काही माहिती नसल्याचे स्पष्ट केले आहे. एकीकडे महापालिकेची आर्थिक परिस्थिती खालावत असताना तिजोरी सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांकडून चुकीच्या कामांचा पायंडा पाडला जात आहे. तब्बल ५२ कोटी ५५ लाखांची बिले एका रात्रीत अदा केल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. , अभिषेक बारणे या गंभीर विषयावर चर्चा टाळण्यासाठी मुख्य लेखा अधिकारी प्रवीण जैन कोणतीही पूर्वसूचना न देता बैठकीला गैरहजर राहिले, ज्यामुळे त्यांच्यावरील संशयाचे धुके अधिक गडद झाले आहे. आता या प्रकरणाची सखोल शहनिशा करून आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी प्रवीण जैन यांच्या विरुद्ध काय कठोर पावले उचलतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. फौजदारी कारवाई होणार का? या प्रकरणावर बोलताना स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे म्हणाले की, या महाघोटाळ्याचे मुख्य सूत्रधार मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन हेच आहेत. हा केवळ तांत्रिक घोळ नसून महापालिकेच्या तिजोरीवर अधिकारी आणि ठेकेदारांनी संगनमताने टाकलेला थेट दरोडा आहे. नवीन वर्षाचे बजेट मंजूर असताना, त्यात कोणतीही तरतूद नसताना ५२ कोटी रुपये वाटलेच कसे जातात? प्रवीण जैन यांनी प्रशासकीय शिस्तीचा भंग केला असून ते आजच्या महत्त्वाच्या बैठकीलाही जाणूनबुजून गैरहजर राहिले. आयुक्तांनी त्यांच्या गेल्या ४ वर्षांच्या कामकाजाची झाडाझडती घ्यावी. जोपर्यंत प्रवीण जैन यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होत नाही आणि त्यांचे निलंबन होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. जनतेचा कष्टाचा पैसा अशा प्रकारे बोगस उपसूचनांच्या नावाने लुटू देणार नाही. उपसुचनांमध्ये कसलीही अनियमितता झाली नाही. सर्व कामांच्या उपसुचना त्या-त्या विभाग प्रमुखांकडून आल्या आहेत. त्या कामांना २०२६-२७ कामांमध्ये तरतूद नसते. त्या कामांना त्याच वर्षांसाठी खर्च करावे लागतात. तसेच त्यावर सुचक-अनुमोदक म्हणून लोकप्रतिनिधींच्या सह्या आहेत. त्यामुळे त्यांना मंजुरी देणे क्रमप्राप्तच होते. तसेच बुधवारी (दि.८) आयुक्त आणि लेखा विभागांची परिषद होती. त्या परिषदेला मी आणि आयुक्त उपस्थित असल्याने महापालिकेत हजर राहू शकलो नाही. – प्रवीण जैन, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, महापालिका