प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरीचिंचवड महापालिकेची रणधुमाळी सुरू असून शुक्रवारी( दि. २) अर्ज माघारी घेण्याच्या शेवटचा दिवस आहे. शहरामध्ये बहुरंगी लढत होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या युतीचे संकेत दिले आहेत. दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेससोबत आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देखील सोबत घेत नवीन युती केली जाणार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणाने आणखी एक वळण घेतले आहे.शहरामध्ये सुरूवातीला शिवसेनेने भाजपसोबत महायुतीमध्ये लढण्याची तयारी केली होती. मात्र, भाजप योग्य जागा देत नसल्याचे लक्षात आल्यावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बोलणी सुरू केली. शिवसेना वेगळी भूमिका घेत असल्याचे लक्षात येताच भाजपाने पुन्हा शिवसेनेला जवळ करण्यास सुरूवात केली. मात्र, अर्ज भरण्याच्या आदल्या दिवसापर्यंत बोलण्यात घोळवत ठेवले. अगदी अर्ज भरण्याच्या आदल्या रात्री महायुतीची बोलणी फिस्कटली. परिणामी, शिवसेनेचा राष्ट्रवादी काँग्रेससोबतचा युती करण्याचा डाव देखील तोपर्यंत उधळला होता. नाइलाजाने अवघ्या काही तासांमध्ये शिवसेनेला शहरातील ३२ प्रभागांमध्ये उमेदवार शोधावे लागले. अवघ्या चार तासांच्या वेळेत शिवसेनेने एबी फॉर्मचे वाटप करत उमेदवारांचे अर्ज भरले. या धावपळीत काहींचे एबी फॉर्म देखील पोहचले नसल्याने अर्ज बाद झाले. आता भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अजित पवार यांनी आणखी एक राजकीय डाव टाकला आहे. दोन्हीही राष्ट्रवादी एकत्रित लढत असताना शिवसेनेला देखील सोबत घेण्यासंदर्भात कोरेगाव भीमा याठिकाणी बोलत असताना अजित पवार यांनी संकेत दिले आहेत. त्याबाबत मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बुधवारी रात्री चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तर पुन्हा एकदा याबाबत शिवसेनेच्या नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले. यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणात पुन्हा एक ट्विस्ट आला आहे. आता दोन्हीही राष्ट्रवादी मिळून १२८ ठिकाणी उमेदवार दिले आहेत. तर शिवसेनेने किती उमेदवार दिले याबाबतची अधिकृत माहिती अद्याप पक्षाकडून देण्यात आली नाही. मात्र, सुमारे ७० ठिकाणी शिवसेनेने उमेदवार दिल्याची माहिती आहे. एकत्रित लढण्याबाबत निर्णय झाला तर काहींचे अर्ज मागे घेत युती करणार की निवडून आल्यानंतर एकत्रित सत्तास्थापनेचा दावा करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, यामुळे पिंपरी चिंचवड शहरात युत्या आणि आघाड्यांचे राजकारण गाजत आहे.