PCMC Election : राजकीय सुडापोटी प्रभागरचना बदलली? ठाकरे गटाचे ॲड. सचिन भोसले यांची उच्च न्यायालयात धाव

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी नुकतीच अंतिम प्रभागरचना जाहीर झाली. यामध्ये प्रभाग क्रमांक २४ मधील म्हातोबानगर झोपडपट्टीचा भाग प्रभाग क्र. २५ मध्ये समाविष्ट करण्यता आला. या बदलाविरुध्द शिवसेना ठाकरे गटाचे माजी शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांनी हा बदल राजकीय सुडापोटी केल्याचा आरोप केला आहे.अंतिम प्रभागरचनेत प्रभाग क्रमांक २४ डांगे चौक, गणेशनगर, थेरगाव या प्रभागात वाकड मधील म्हातोबा झोपडपट्टीचा समावेश होता.
याठिकाणी म्हातोबा झोपडपट्टीचा समावेश प्रभाग क्रमांक २५ मध्ये केला आहे. या बदलाचा येथील आरक्षणावर परिणाम होणार आहे. या संदर्भात ॲड. भोसले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक २४ मध्ये अनुसूचित जातीसाठी आरक्षण निश्चित होते. तरीही राजकीय स्वार्थ साधण्यासाठी मतदारसंख्या कमी करण्याचा आणि प्रभागाच्या सीमारेषांमध्ये फेरबदल करण्याचा प्रकार जाणूनबुजून केला आहे. या बदलांमुळे त्या प्रभागातील समाजाच्या प्रतिनिधित्वावर परिणाम झाला आहे.
अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या प्रभागाचा मूळ हेतूच डावलला गेला आहे. हा निर्णय पूर्णपणे राजकीय सुडबुद्धीने घेतला आहे. पालिकेच्या प्रभागरचनेच्या प्रक्रियेत पारदर्शकतेचा पूर्ण अभाव राहिला आहे. राजकीय दवावाखाली विशिष्ट पक्षांना लाभ होईल अशा पद्धतीने प्रभागरचना करण्यात आली. यामुळे नागरिकांमध्ये देखील तीव्र असंतोष निर्माण झाला आहे, असे ॲड. भोसले यांनी नमूद केले आहे.
“अन्यायकारक प्रभागरचनेविरोधात न्याय आणि सत्याच्या बाजूने उभे राहत हायकोर्टात रिट पिटिशन दाखल केली आहे. या याचिकेद्वारे प्रभाग क्रमांक २४ मधील संबंधित आकडेवारीचा तपशील सादर करून अनुसूचित जातींच्या आरक्षणाचा हेतू अबाधित राहण्यासाठी मागणी करण्यात आली आहे.”
– ॲड. सचिन भोसले, माजी शहराध्यक्ष, शिवसेना (उद्धव ठाकरे गट)





