PCMC Election: नववर्षात स्पष्ट होणार अंतिम उमेदवार; प्रभागांत ४-५ दावेदार, इच्छुकांची धावपळ

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत राजकीय समीकरणे ताणली गेली आहेत. संभाव्य बंडखोरीचा मोठा धोका टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची घोषणा जाणीवपूर्वक राखून धरल्याचे चित्र दिसत आहे. मंगळवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत समोर असली तरी खरी लढत कोणामध्ये रंगणार, याची स्पष्टता नामांकन मागे घेण्याच्या अंतिम दिवशी म्हणजे नववर्षातच होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत कोणत्या प्रभागातून कोण उतरते, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महायुतीमध्येही फाटाफूट झाली आहे. त्यामुळे भाजपने एकला चलो रे चा नारा दिला आहे. तर महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसशी हातमिळवणी केली आहे.
भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या दोन्ही पॅनेलमध्ये बंडखोरीची शक्यता तीव्र असल्याने अधिकृत उमेदवारांची घोषणा अद्याप रखडलेली आहे. अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस मंगळवार असला तरी अंतिम लढतीचे स्वरूप नववर्षातच स्पष्ट होणार आहे.शहरातील सर्व प्रभागांत इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली असून अनेक ठिकाणी एकाच पक्षातून एका जागेसाठी चार-पाच दावेदार पुढे सरसावले आहेत.
“कामाला लागा, उमेदवारी मिळेल” अशा गुप्त आश्वासनांमुळे अनेकांनी घरोघरी जाऊन प्रचारालाच सुरुवात केली आहे. मात्र, जागावाटप आणि अधिकृत तिकीट वाटपातील विलंबामुळे संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी असलेली महायुतीतील भाजप आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादी-कामगार पक्षांमध्ये जागावाटपाचा तोडगा निघालेला नाही.
रविवारी उमेदवारांची यादी जाहीर होईल, अशी चर्चा रंगली होती; परंतु उशिरापर्यंत कोणतेही चित्र स्पष्ट झाले नाही. त्यामुळे इच्छुकांकडून शहरातील ज्येष्ठ नेत्यांच्या कार्यालयांत आणि घरी सतत संपर्क साधला जात आहे.बंडखोरीचा स्फोट टाळण्यासाठी दोन्ही युती-आघाड्यांतील वरिष्ठ नेते सावध पवित्रा घेत असल्याची माहिती समोर येत आहे.
कुणालाही नाराज करू नका, सर्वांना विश्वासात घ्या, अशा सूचना स्थानिक पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची चर्चा आहे. कारण अधिकृत उमेदवारी न मिळाल्यास बंडखोर उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत मंगळवारी (दि. ३० डिसेंबर) असून अर्ज केवळ प्रत्यक्ष उपस्थित राहून (ऑफलाइन) सादर करता येणार आहेत.
नामांकनानंतर २ जानेवारी हा माघारी घेण्याचा शेवटचा दिवस ठरणार असून त्यानंतरच अधिकृत उमेदवारांची अंतिम यादी स्पष्ट होईल. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील खरी राजकीय लढत नववर्षाच्या सुरुवातीलाच कळणार आहे.





