प्रभात वृत्तसेवा पिंपरी ( प्रकाश गायकर ) – पिंपरी चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक तब्बल आठ वर्षांनंतर होत आहे. त्यासाठी प्रशासनाची जोरदार तयारी सुरू आहे. तर राजकीय वातावरण देखील तापले आहे. शहरामध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामना होणार असला तरी भाजपामधीलच जुन्या नव्यांचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. गेल्या निवडणुकीत संधी न मिळालेले तसेच अनेक वर्ष भाजपाचे काम इमाने इतबारे करणाऱ्या निष्ठावंतानी देखील तलवारी उपसल्या आहेत. वैचारिक मतभेद असलेल्या या जुन्या आणि नव्याने पक्षात आलेल्यांचे शीतयुद्ध गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. पक्षातील याच अंतर्गत कलहावर फुंकर घालण्याचे काम भाजपाचे नेते तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील गेल्या तीन दिवसांपासून करत आहेत.सन २०१७ पूर्वी पिंपरी चिंचवड शहरात भाजपची ताकद मर्यादित होती. असे असले तरी भाजपाला मतदान मोठ्या प्रमाणात होत असे. हाताच्या बोटावर मोजण्याइतके नगरसेवक असलेल्या पक्षाने केंद्र व राज्यात २०१४ साली सत्ता मिळवल्यानंतर शहरात चांगलेच हात पाय पसरले. शहरातील दिग्गज नेत्यांनी सत्तेच्या वळचणीला जात भाजपाचे कमळ हाती घेतले. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने शहरात भक्कम पाया रचला. त्यानंतर भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या भाजप प्रवेशाने पक्षाला चांगले बळ मिळाले. दोन मतदारसंघातील या नेत्यांनी भाजपामध्ये आल्यानंतर २०१७ च्या निवडणुकीत अनेक नव्या चेहऱ्यांना पक्षाचे तिकीट दिले. केंद्रातील नेतृत्वाच्या लाटेवर स्वार होत अनेक नवे चेहरे महापालिकेच्या सभागृहात चमकले. मात्र, या सगळ्यात शहरात पक्षाची ताकद नसताना पक्षामध्ये प्राण जीवंत ठेवणारा निष्ठावंत कार्यकर्ता मागे पडला. पाच वर्षाच्या सत्ता काळात या निष्ठावंत कार्यकर्त्यांना ना कोणते पद मिळाले ना मान मिळाला. परिणामी, पक्षामध्ये सातत्याने जुना नवा वाद चिघळत राहिला.आता निवडणुकीच्या तोंडावर हाच वाद भाजपाला बॅकफूटवर नेण्याची शक्यता आहे. त्यामुळे वणवा पेटण्याआधीच ठिणगी विझवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी सूत्रे हातात घेतली आहेत. भाजपाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना शहरात येऊन आढावा घेण्यासाठी विनंती केली होती. त्या विनंतीचा वरवर देखावा आणि पक्षातील आदेशाने चंद्रकांत पाटील यांनी शहरामध्ये तीन दिवस आढावा बैठकी घेतल्या. विधानसभा निहाय घेतेल्या या बैठकांमध्ये महापालिका निवडणुकीसाठीची तयारी, नियोजन यासोबतच जुन्या व नव्या कार्यकर्त्यांची मने जुळविण्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटील यांनी केला. तिकीट वाटपाच्यावेळी या शिष्टाईला किती यश आले हे समजेल. मात्र, हा वाद मिटविण्यात यश आले नाही तर नव्या चेहऱ्यांना पुढे घेऊन जाणाऱ्या भाजपाला निष्ठावंतांच्या बंडखोरीचा सामना करावा लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामुळे असंतोष वाढणार.. भाजपकडून उमेदवारीबाबत धोरण जाहीर करण्यात आले आहे. निवडून येण्याची क्षमता आणि जनतेतील स्वीकार्यता पाहूनच उमेदवारांची निवड केली जाईल. त्यामुळे केवळ जुने कार्यकर्ते असल्याच्या आधारावर उमेदवारी मिळेल, याची खात्री नाही. यामुळे पक्षातील असंतोष आणखी वाढण्याची शक्यता आहे. इतर पक्षांचाही डोळा.. दरम्यान, शहरातील राजकारणात भाजपविरोधी पक्षांनीही या अंतर्गत कलहावर लक्ष ठेवले आहे. भाजपमधील जुने-नवे वाद, कार्यकर्त्यांमधील नाराजी आणि तिकिटांसाठी चाललेली चुरस याचा फायदा घेण्यासाठी प्रतिस्पर्धी पक्ष तयारीला लागले आहेत. त्यामुळे येत्या काही आठवड्यांत पिंपरी चिंचवड महापालिकेचे राजकारण आणखी रंगत जाण्याची चिन्हे आहेत.