प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नव्या प्रभागरचनेने शहरामध्ये मोठा राजकीय धुरळा उडाला आहे. माजी नगरसेवकांसह इच्छुकांनी नव्या दम्याने कामाला सुरूवात केली आहे. त्यामध्ये देखील अद्याप आरक्षणानंतर आणखी पडझड होण्याची शक्यता आहे. प्रभागामध्ये महिला आरक्षण पडले तर बहुतांश उमेदवारांचा पत्ता कट होणार आहे. मात्र आपले राजकीय भवितव्य आजमावण्यासाठी अनेकांनी सौभाग्यवतींचा प्रचार करण्यास सुरूवात केल्याचे चित्र शहरात आहे. निवडणुकीसाठी प्रारुप प्रभागरचना झाल्यानंतर शहरामध्ये निवडणुकीचा रंग चढू लागला आहे. शहरामध्ये ३२ प्रभागांमधून १२८ नगरसेवक होणार आहेत. प्रभागरचना झाल्यापासून अनेक इच्छुक नव्या दमाने कामाला लागले आहेत. सन २०१७ नुसारच प्रभागरचना झाली असून अंतिम प्रभाग रचनेत सहा प्रभागांमध्ये किरकोळ बदल करण्यात आला आहे. त्याचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला बसणार आहे. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या पक्षाचे माजी शहरप्रमुख ॲड सचिन भोसले यांच्या प्रभागातील सहा हजारांहून अधिक मतदार बाजूच्या प्रभागात टाकत प्रभाग फोडला आहे. त्यामुळे त्याठिकाणि आरक्षण पडणार नसल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे. आता आरक्षण सोडतीनंतर प्रभागाचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, महिला आरक्षण पडले तर अनेकांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यामध्ये देखील अनेकांनी महिला आरक्षण पडल्यास घरातील सौभाग्यवतींना लढवून राजकीय भवितव्य टिकवण्याची खेळी केली आहे. आरक्षण सोडतीनंतर अनेकांचा राजकीय प्रवास स्पष्ट होणार आहे. आपल्याला नाही तर किमान आपल्या पत्नीसाठी तिकीट मिळवून राजकीय भवितव्य टिकवून ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घरातीलच व्यक्ती नगरसेवक व्हावी यासाठी अनेकांनी सौभाग्यवतींच्या प्रचाराला सुरूवात केली आहे. प्रभागाचे नकाशे सोशल मीडियावर टाकत प्रचाराला सुरूवात केली आहे. स्वतःबरोबरच सामाजिक माध्यमावर सौंचो फोटो टाकत प्रचार सुरू आहे. महिलेसाठी जागा आरक्षित झाल्यास त्याठिकाणी घरातीलच व्यक्तींला उभे करत आपले राजकीय भवितव्य अबाधित ठेवण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे. असे असेल आरक्षण.. एससीच्या २०, एसटीच्या ३ जागेनंतर ओबीसीसाठी ३५ जागांवर तसेच, खुल्या गटातील ३५ जागांवर महिलांचे आरक्षण पडणार आहे. प्रभागातील अ, ब, क आणि ड या चार जागा कोणाला सुटणार, एकूण १२८ पैकी महिलांसाठी कोणत्या प्रभागातील जागा सुटणार, याबाबत इच्छुकांसह माजी नगरसेवक व इच्छुकांचे लक्ष लागले आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून घरा-घरात पोहचण्याचा प्रयत्न.. निवडणुकीमध्ये मतदार आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रमांची प्रभागामध्ये रेलचेल सुरू झाली आहे. अनेकांनी आपल्या सौना घेऊन प्रभागामध्ये हळदी-कुंकू, खेळ पैठणीचा आदी कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली आहे. त्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे.