प्रभात वृत्तसेवा पिंपरी – शहरातील प्रभाग क्रमांक १ चिखली हा सर्वात मोठा प्रभाग असून या प्रभागामध्ये सर्वाधिक ७४ हजार ३४० मतदार आहेत. एवढ्या मतदारांपर्यंत पोहचताना उमेदवारांची पळता भुई थोडी होणार आहे. तर सर्वात कमी मतदारसंख्या ही थेरगाव गावठाण येथील प्रभाग क्रमांक २३ मध्ये आहे. या प्रभागातील उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहचणे सहज शक्य आहे.शहरातील पिंपरी, भोसरी, चिंचवड आणी भोर विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या मतदार यादी शहरातील प्रभागानुसार फोडण्यात आली आहे. शहरामध्ये महिला मतदार ९ लाख ४ हजार ८१५, पुरुष ८ लाख ७ हजार १३९ तर इतर १९७ असे १७ लाख १२ हजार १५१ मतदार आहेत. प्रभाग १ ते ३२ याप्रमाणे या मतदारांच्या याद्यांचे वितरण करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वाधिक मतदारसंख्या ही चिखली या भागामध्ये आहे. त्याखालोखाल प्रभाग क्रमांक ३ चऱ्होली, मोशी गावठाण या भागामध्ये ७२ हजार ४११ मतदार आहेत. प्रभाग २६ पिंपळे निलख या भागामध्ये ६८ हजार ३१७ मतदार आहेत. शहरातील बहुतांश प्रभागांमध्ये मतदारसंख्या ही ५० हजारांच्या पुढे आहे. त्यामुळे या प्रभागांमध्ये मतदारांपर्यंत पोहचताना उमेदवारांची दमछाक होणार आहे. महिला मतदारांची संख्या अधिक शहरामध्ये महिला मतदारांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे. सर्व प्रभागांमध्ये मिळून ९ लाख ४ हजार ८१५ महिला मतदार आहेत. तर पुरुष मतदारांची संख्या ८ लाख ७ हजार १३९ इतकी आहे. म्हणजेच पुरुषांपेक्षा ९७ हजार ६७६ महिला मतदार अधिक आहेत. पहिल्याच दिवशी ४० याद्यांची विक्री महापालिकेने मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर पहिल्याच दिवशी तब्बल ४० मतदार याद्यांची विक्री झाली. महापालिकेच्या वतीने या याद्यांसाठी शुल्क आकारले जात आहे. प्रति पृष्ठ एका बाजूने २ रुपये म्हणजेच एका पाटपोट पानाला ४ रुपये शुल्क घेतले जात आहे. पृष्ठसंख्येनुसार काही प्रभागांची संपूर्ण यादी विकत घेण्यासाठी १५ ते १८ हजार रुपयांचे शुल्क भरावे लागत आहे.