प्रभात वृत्तसेवा पिंपरी – आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारी निमित्त शहरातील मतदान केंद्रांची स्थळनिश्चिती, निवडणूक कक्ष अधिकाऱ्यांची नेमणूक, मतदान केंद्रांची सुविधा, अपंगजनांसाठी सोयी, मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, ईव्हीएमची सुरक्षितता, मतदार यादी अद्ययावत करणे, प्रभागांतील आवश्यक पायाभूत दुरुस्ती, प्रारूप मतदार यादीतील बदल आणि मतदानासाठी नागरिकांमध्ये जनजागृती वाढवण्याचे तसेच तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करण्याचे निर्देश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी (दि. १७) सार्वत्रिक निवडणुकीसह महापालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेतला. बैठकीत प्रथम शहरातील दैनंदिन सेवा, स्वच्छता व्यवस्था, खड्डेमुक्ती मोहिम आणि मास्टर प्लॅन अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांची माहिती आयुक्तांनी मागवली. अवैध होर्डिंग हटविण्याची मोहीम, रस्ते प्रकाशयोजना, जलपुरवठा व ड्रेनेज यंत्रणेची स्थिती याबाबतही सविस्तर चर्चा करत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीसंदर्भात प्रशासनाच्या सर्व शाखांकडून अहवाल सादर करण्यात आले. नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी नियंत्रण कक्ष अधिक सक्षम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सर्व विभागांनी समन्वय राखत प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करावीत, असे निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. महापालिकेच्या मूलभूत सुविधा आणि सेवांवर अधिक भर देऊन कार्यक्षमता वाढवण्याचे आदेशही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले. सर्व प्रभागांना विशेष मोहीम राबवून अवैध होर्डिंग तातडीने हटवण्याचे निर्देश देण्यात आले. सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या किंवा वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या बोर्डांवर तत्काळ कारवाई करावी, तसेच परवानाधारक होर्डिंगची माहिती अद्ययावत ठेवून महसूल विभागाशी समन्वय वाढवावा, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.