PCMC Election : आज जाहीर होणार अंतिम प्रभागरचना! ३१८ हरकतींनंतर काय ठरलं, जाणून घ्या

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेची १२८ जागांसाठीची अंतिम चार सदस्यीय प्रभाग रचना सोमवारी (दि. ६) जाहीर होणार आहे. त्यानंतर आरक्षण सोडत होणार आहे. आरक्षण सोडतीमध्ये आपली जागा सुटणार का, याची उत्सुकता इच्छुकांना लागली आहे.महापालिकेने चार सदस्यीय ३२ प्रभागाची प्रारुप रचना २२ ऑगस्ट २०२५ ला जाहीर केली. त्यावर ४ सप्टेंबरपर्यंत एकूण ३१८ सूचना व हरकती प्राप्त झाल्या. प्राधिकृत अधिकारी प्रवीण दराडे यांच्या उपस्थितीत चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात १० सप्टेंबरला हरकतींवर सुनावणी पूर्ण झाली.
प्राधिकृत अधिकार्यांकडून अंतिम अहवाल राज्याच्या नगर विकास विभागास सादर करण्यात आला. त्या विभागाकडून राज्य निवडणूक आयोगाकडे तो अहवाल सादर करण्यात आला आहे. अंतिम प्रभाग रचना सामेवारी (दि. ६) प्रसिद्ध केली जाईल, असे महापालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले.प्रभाग रचना फेब्रुवारी २०१७ नुसार कायम राहणार की, त्यात काही बदल केला जाणार त्याची उत्सुकता इच्छुकांना लागली आहे. प्रभागर रचनेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरक्षण सोडत काढली जाणार आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि सर्वसाधारण महिला असे आरक्षण टाकले जाणार आहे. महापालिकेच्या नगरसेवकांच्या एकूण १२८ जागा आहेत त्यापैकी ९३ जागांवर वेगवेगळे आरक्षण पडणार आहे. त्यामुळे कोणत्या जागेवर आरक्षण पडणार आणि कोणती जागा सुटणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. आपल्या जागेवर आरक्षण पडू नये, अशी अपेक्षा अनेक इच्छुकांकडून व्यक्त केली जात आहे.
महिला आरक्षण पडल्यास पर्यायाची तयारी..
आरक्षण सोडतीत इच्छुक जागेवर महिला आरक्षण पडल्यास ऐनवेळी गोची होऊ नये म्हणून अनेक इच्छुकांनी आपल्या सोबत पत्नीलाही निवडणूक मैदानात उतरवले आहे. विविध कार्यक्रमांत इच्छुकांसह पत्नीचे छायाचित्र ठळकपणे लावले जात आहे. फ्लेक्स व सोशल मीडियाच्या संदेशावर पत्नीला ठळक स्थान देण्यात येत आहे. त्या माध्यमातून पत्नीचे नाव व छायाचित्रे मतदारांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.





