प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक ज्या प्रभागातून निवडून आले होते, त्या प्रभागातील मतदारच दुसऱ्या प्रभागामध्ये टाकण्यात आले आहेत. यामधून भाजपाने निवडणूक कारभारात हस्तक्षेप करत राष्ट्रवादी काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा डाव आखला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या याद्यांवर विरोधकांनी आक्षेप घेतले असून मतदारयाद्या तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. मात्र, यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीमधील सुप्त संघर्ष आणखी उफाळून येत राजकीय रण तापण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजपाचे चार आमदार आहेत. गतवेळच्या निवडणुकीमध्ये भाजपाने ७७ जागांवर यश मिळवले होते. ही सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी भाजपाने डाव टाकण्यास सुरूवात केली आहे. महापालिका प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप केला असल्याची टीका होऊ लागली आहे. महापालिकेत निवडून येणाऱ्या नगरसवेकांची संख्या १२८ असून चार सदस्यीय पध्दतीने ३२ प्रभाग तयार करण्यात आले. या सर्व प्रभागात एकूण १७ लाख १३ हजार ८९१ मतदार आहेत. त्यामध्ये विधानसभा मतदारसंघानुसार चिंचवड विधानसभेत सर्वाधिक ६ लाख ७६ हजार ६३८, भोसरीत ६ लाख २४ हजार १५२, पिंपरीत ३ लाख ९९ हजार ८११ आणि भोर विधानसभेतील ताथवडेगावात १३ हजार २९० मतदार आहेत. या विधानसभेच्या मतदार याद्या फोडून प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या. परंतु, महापालिकेच्या बहुसंख्य प्रभागांच्या मतदार यादीत घोळ पुढे येवू लागले आहेत. राजकीय सुडापोटी काही नावे, चाळी, सोसायट्या वगळून दुसऱ्याच यादीत समाविष्ट केल्याच्या तक्रारी इच्छुकांकडून केल्या जात आहेत. अनेक ठिकाणी मतदारांची नावे वगळून भलत्याच प्रभागाच्या यादीत टाकण्यात आली आहेत. या मतदार याद्यांमध्ये दुबार मतदारांची मोठी संख्या समोर आली आहे. महापालिकेच्या सर्व प्रभागात मिळून असलेल्या मतदारांपैकी तब्बल ९२ हजार ६६४ मतदारांची नावे दुबार असल्याचे पुढे आले आहे. सहन ही होत नाही सांगताही येत नाही राज्यामध्ये महायुतीचे सरकार आहे. शहरात युतीमधील भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्त संघर्ष आहे. भाजपाचे स्थानिक आमदार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या पॉवरने सातत्याने राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, महायुतीतील संघर्षावर कोणीही काहीही बोलायचे नाही असे आदेश असल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. परिणामी प्रभागरचनेपासून ते मतदार याद्या फोडेपर्यंत राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांना सहनही होत नाही अन सांगताही येत नाही अशी अवस्था झाली आहे. याठिकाणी धक्का देण्याचा प्रयत्न महापालिका निवडणूक विभागाच्या यादीत स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमा सावळे यांच्या प्रभागातील यादी क्रमांक ३८८, ३८९, आणि ३९० मधील सुमारे ४ हजार ५०० मतदारांची नावेच गायब आहेत. सावळे या भाजपाच्या असल्या तरी भाजपा आणि त्यांच्यामधील शीतयुद्ध लपून राहिलेले नाही. तळवडे प्रभाग क्र. १२ मधील मतदारांची नावे चिखली प्रभाग क्र.१ मध्ये टाकण्यात आली आहेत. प्रभाग १२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. याठिकणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक यांचेच नाव यादीतून गायब आहे. मतदार यादीत प्रभाग क्र. ६ धावडेवस्ती, चक्रपाणी वसाहतच्या यादीत देखील घोळ पाहायला मिळाला. या प्रभागाच्या यादीत चक्क मोशी, बोऱ्हाडेवस्ती, शिवाजीवाडी, कुदळीवाडी या भागातील मतदारांच्या नावांचा समावेश झालेला आहे. प्रभाग ६ मधून बिनविरोध नगरसेवक झालेले रवी लांडगे यांचे वर्चस्व आहे. त्यांनी भाजपाशी घेतलेला पंगा शहरभर चर्चेत आहे.