प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची आगामी निवडणूक भारतीय जनता पक्षाने एकट्याने लढायची की युती करून, याचा निर्णय स्थानिक परिस्थिती पाहून शहर भाजपची कोअर कमिटी घेईल, आणि त्यानंतर वरिष्ठ पातळीवर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. शनिवारी, चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित शहर भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. पक्षप्रवेश या प्रसंगी, बजरंग दलाचे विभाग पुणे विभाग संयोजक कुणाल साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अरुण टाक, आशा सोदाई, मावळ तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष हेमंत राऊत, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते जगदीश येवले, प्रभाग क्रमांक १७ चिंचवडे नगर येथील धनंजय आंबुसकर, संत तुकाराम नगर प्रभागातील डॉ. संदीप बागडे, प्रभाग क्रमांक १४ संतोष चौगुले, पिंपळे सौदागर येथील प्रसिद्ध उद्योजक संदीप काटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. फक्त भाजपच राष्ट्रहिताचा एजेंडा घेऊन चालतो “भाजपचे कार्यकर्ते वैचारिक भूमिका घट्ट धरून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारताची ओळख जगभर पोहोचली आहे. फक्त भाजप हाच पक्ष देशाच्या हिताचा विचार करणारा अजेंडा घेऊन चालतो. बाकीच्या प्रादेशिक पक्षांचा अजेंडा हा कुटुंबावर आधारित असतो. आपला अजेंडा देश आणि देशाच्या फायद्यासाठी आहे, असे वक्तव्य करत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी नाव न घेता आपल्या विरोधी पक्षांसोबत मित्र पक्षांनाही टोला लगावला. कार्यकर्त्यांना ‘बूथ’वर ५१ टक्के मतांची लढाई लढण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आणि ‘भारत माता की जय, वंदे मातरम’ चा मंत्र प्रत्येकाच्या मनात पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यास सांगितले. ‘शंभर पार’चा नारा आणि स्थानिक नेत्यांचा आग्रह प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी सांगितले, “शहरात भाजपला मोठी ताकद मिळाली आहे. मनपा निवडणुकीत १०० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचाच महापौर होईल. त्यासाठी मतदारांपर्यंत पोहोचून पदवीधर मतदार नोंदणी वाढवावी.” शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी ‘शंभर पार’चा नारा दिला व महानगरपालिका निवडणूक जिंकण्याचा संकल्प सोडला आणि शहराच्या विकासासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री यांनी जास्तीत जास्त अशी मागणी यावेळी त्यांनी केली.