PCMC Election 2025 | महायुती पिंपरीत आमनेसामने! ; भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटेंचा मोठा खुलासा

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – महापालिका निवडणुकीसाठी शहर भाजपाने पूर्ण तयारी केली आहे. शहरामध्ये भाजापाची ताकद असून भाजपालाच बहुमत मिळेल. त्यामुळे ही निवडणूक आम्ही स्वबळावरच लढणार असल्याचे भाजपाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी रविवारी (दि. १४) पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले. त्यामुळे राज्यामध्ये महायुती म्हणून भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) आणि शिवसेना एकत्र असले तरी पिंपरी चिंचवड शहरामध्ये महापालिकेसाठी हे पक्ष आमने सामने येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काटे म्हणाले, ‘‘महापालिका निवडणुकीसाठी भाजपने सूक्ष्म नियोजन केले आहे. शहरातील प्रत्येक मतदारांपर्यंत आम्ही पोहचलो आहे. महापालिकेच्या १२८ जागा लढविण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपने ७७ जागा जिंकत सत्ता मिळवली होती. यंदा भाजपने सर्वच जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. महापालिका निवडणुका युतीत लढायच्या की नाही, हा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल.
मात्र, शहरात आमची संघटनात्मक ताकद भक्कम असून आम्ही स्वबळावर लढण्याची १०० टक्के तयारी केली आहे. शहर भाजपच्या वतीने महापालिका निवडणुकीच्या बाबतीत तीन सर्व्हे केले आहेत. त्यामध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळेल, असेच आकडे आले आहेत. त्यामुळे भाजपला बहुमत मिळेलच यात शंका नसल्याचे काटे यांनी स्पष्ट केले.
विचार करूनच पक्षप्रवेश..
सध्या विरोधी पक्षातील तसेच युतीच्या घटक पक्षातीलही काहीजण भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत. मात्र, त्यांचा प्रवेश करण्याबाबत पक्षातील सर्वांना विश्वासात घेऊनच पक्षप्रवेश केले जातील. पक्षातील ज्येष्ठ तसेच निष्ठावान दुखवणार नाही याची काळजी घेतली जाईल असेही काटे यांनी स्पष्ट केले.





