PCMC Budget – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात ४१४.२२ कोटी रुपयांची वाढ सुचविण्यात आली असून एकूण ९३२२.१७ कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी महापालिका सभेत मंगळवारी (दि. २३) सादर केले. यामध्ये सुमारे ११०० उपसूचनांद्वारे नवीन कामांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने नगरसेवकांना स्वतंत्र निधीसह कलाकार कट्टा, हेल्थ डेस्क, टाटा म्युझियमसारख्या नवीन संकल्पना व प्रकल्पांसाठी तरतूद करण्यात आली आहे. प्रशासनाने केलेल्या अंदाजपत्रकात अनेक नवीन प्रकल्पांचा समावेश करत सत्ताधाऱ्यांनी अंदाजपत्रक बदलले आहे. महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेत स्थायी समितीचे सभापती बारणे यांनी अंदाजपत्रकाचे सादरीकरण केले. महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकात जुन्या कामांचा समावेश होता. नवीन प्रकल्प हाती घेतलेले नव्हते. त्यात सुधारणा करून उत्पन्नवाढ आणि विकासकामांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील सुचवलेल्या अनेक नवीन कामांचा समावेश केला आहे. महापालिकेच्या ३२ प्रभागांतील नगरसेवकांनी सुचविलेल्या सुमारे ११०० नव्या कामांचा अंदाजपत्रकात समावेश करण्यात आला असून, त्यासाठी १९६.९० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पवना धरणातून निगडीपर्यंत नवीन समांतर जलवाहिनी टाकण्याचा १०० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात येणार असून, यावर्षी ४० कोटींची तरतूद आहे. पिंपरी चिंचवड महापालिका अंदाजपत्रक २०२६ शहराला सध्या ६५८ एमएलडी पाणीपुरवठा होत असून, गळती रोखणे आणि शुद्ध पाणी देण्यासाठी विविध कामांना निधी देण्यात आला आहे, असे अभिषेक बारणे यांनी अंदाजपत्रकातून स्पष्ट केले आहे. याशिवाय शहरातील प्रमुख चौक सिग्नलमुक्त करण्यासाठी योजना, ‘पे अँड पार्क’ धोरण, तसेच बीआरटी कॉरिडॉरमधून ४० कोटींची वाढ अपेक्षित असून, उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर प्रकल्पांना गती मिळणार आहे. यासह बेघरांसाठी निवारा, ऑक्सिजन पार्क, रेन वॉटर हार्वेस्टिंग, हॉकर्स झोन यांसारख्या उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले आहे. उत्पन्नवाढीवर लक्ष बांधकाम परवानगी विभागात सर्वाधिक २५८ कोटींची वाढ अपेक्षित आहे. मालमत्ता कर विभागातही शहराच्या वाढत्या विस्तारामुळे वर्गवारीत बदल होऊन ५० कोटींहून अधिक उत्पन्नाची अपेक्षा आहे. होर्डिंग परवाना विभागात झोनची पुनर्रचना केल्याने ३४ कोटींचा महसूल वाढणार आहे. पाणीपट्टीतून २० कोटी, तर भूमी-जिंदगी विभागातून ४ कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. नगरसेवकांसाठी १३ कोटींची तरतूद शहरातील प्रभागस्तरीय विकासकामांना गती देण्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात प्रत्येक नगरसेवकाला १० लाख रुपयांचा स्वतंत्र निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकूण १२८ नगरसेवकांसाठी सुमारे १३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून प्रभागातील लहान पण तातडीची कामे जसे की रस्त्यांची दुरुस्ती, गटार व्यवस्था, पदपथ सुधारणा, तसेच उद्यानांचे सुशोभीकरण ही कामे करता येणार आहेत. “हा केवळ आकड्यांचा मेळ नसून शहराला सुरक्षित, प्रदूषणमुक्त आणि आधुनिक बनवण्याचा एक विश्वास आहे. आम्ही केवळ खर्च वाढवला नाही, तर बांधकाम परवाना आणि करांच्या माध्यमातून उत्पन्नाचे नवे स्त्रोतही निर्माण केले आहेत. शहराच्या शेवटच्या घटकाचा विचार करूनच हा शाश्वत विकासाचा संकल्प आम्ही सोडला आहे. नगरसेवकांना आपल्या प्रभागात नागरिकांची कामे करता यावीत यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद केली आहे.” – अभिषेक बारणे, अध्यक्ष, स्थायी समिती, पिंपरी-चिंचवड महापालिका