PCMC : महापालिकेचा वर्धापन दिन! खेळ पैठणीचा’ ते रक्तदान शिबिर, जाणून घ्या कार्यक्रमांची रूपरेषा

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १०) सकाळी १० वाजता उद्योगनगरीचे शिल्पकार माजी नगराध्यक्ष आण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून होणार आहे.
या कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार अमित गोरखे, उमा खापरे, महेश लांडगे, शंकर जगताप, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲड.गोरक्ष लोखंडे तसेच माजी खासदार, माजी आमदार, माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील,विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर तसेच पालिकेतील विविध विभागप्रमुख, विविध सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
वर्धापन दिन कार्यक्रमाची सुरुवात नगरीचे शिल्पकार माजी नगराध्यक्ष दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात येणार आहे. त्यानंतर रक्तदान शिबिर, रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम खेळ पैठणीचा आयोजित करण्यात आला आहे. दुपारी २ वाजता महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी गीतगायनाचा सांस्कृतिक कार्यक्रम चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित करण्यात आला असून, सायंकाळी ५ वाजता उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा आणि वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांचा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे.





