प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची बदली झाली आहे. त्यांच्याजागी मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यांनी पदभार स्वीकारला असून दिवाळी होताच महापालिकेतील महत्वाच्या विभागाच्या अधिकार्यांची बदली करण्यात आली आहे. त्यामध्ये आरोग्य विभागाचे उत्तम काम सुरू असतानाही उप आयुक्त सचिन पवार यांची बदली करण्यात आली आहे. या बदल्यांमागे राजकीय सूत्रे फिरली असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांची बदली झाल्यानंतर वन व महसूल विभागाने मोनिका ठाकूर यांची अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली केली. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी महापालिकेतील कर संकलन विभागाचे कामकाज पाहणारे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांची देखील बदली झाली. त्यांच्या बदलीने रिक्त झालेल्या विभागप्रमुखपदी अधिकार्याची नियुक्ती होणे आवश्यक होते. त्यासाठी महापालिकेतील अधिकार्यांची खांदेपालट करण्यात आली. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. त्यानुसार, कर संकलन विभागाची जबादारी उप आयुक्त पंकज पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांच्याकडे क्रीडा विभागाची देखील जबाबदारी असणार आहे. तर स्वच्छचा भारत अभियान व आरोग्य विभागाची जबाबदारी उप आयुक्त सचिन पवार यांच्याकडून काढत उप आयुक्त प्रदीप ठेंगल यांच्याकडे दिली आहे. गेल्या एक वर्षांपासून पवार यांनी आरोग्य विभागाचे कामकाज सुरळित केले होते. तसेच शहरातील कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढत अनेक ठिकाणी साचणारे कचर्याचे ढीग कमी झाले होते. तसेच सोसायट्यांशी समनव्य ठेवत आरोग्य कर्मचारी आणि नागरिक यांच्यामध्ये दुवा साधला होता. मात्र, अचानक त्यांच्याकडील आरोग्य विभागाची जबाबदारी काढत त्यांच्याकडे जनगणना व निवडणूक विभाग देण्यात आला आहे. तर, उप आयुक्त प्रदीप ठेंगल यांच्याकडे नागरी सुविधा केंद्रासह आरोग्य व स्वच्छ भारत अभियानाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांची बदली झाल्यानंतर सोमवारी (दि. २७) त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्याबाबतचे देखील आदेश आयुक्त हर्डीकर यांनी काढले आहेत. आयुक्तांनी पदभार घेताच पालिकेतील महत्वपूर्ण विभागाचे कारभारी बदलेले आहेत. मात्र, हे बदल करत असताना चांगल्या पद्धतीने काम सुरू असलेल्या विभागांचे देखील अधिकारी बदलले आहेत. त्यामुळे या बदल्यांमागे प्रशासकीय सोय आहे की राजकीय दबाव याबाबत चर्चांना उधाण आले आहे.