PCMC Action : धुळीच्या साम्राज्यावर मनपाचा बुलडोझर! १७९ बिल्डरांना नोटिसा, परवाने रद्द करण्याचा इशारा
PCMC Action : बांधकाम स्थळांवर धूळ नियंत्रणाचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या १७९ विकासकांना पिंपरी-चिंचवड महापालिकेने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.

PCMC Action – पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या धूळप्रदूषणाविरोधात अखेर महापालिकेने मोठी कारवाई सुरू केली आहे. बांधकाम स्थळांवर प्रदूषण नियंत्रण नियमांची पायमल्ली करणाऱ्या तब्बल १७९ बांधकाम व्यावसायिक आणि विकासकांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. या कारवाईमुळे शहरातील रिअल इस्टेट क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बांधकामांमुळे धुळीचे लोट हवेत पसरत आहेत. त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी सातत्याने महापालिकेकडे येत होत्या. त्यानंतर प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
महापालिकेच्या तपासणीदरम्यान अनेक बांधकाम प्रकल्पांवर धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचे आढळून आले. काही ठिकाणी बांधकाम स्थळांभोवती हिरवी जाळी लावलेली नव्हती. तर अनेक प्रकल्पांवर नियमित पाण्याचा फवारा मारला जात नसल्याने धूळ थेट रस्त्यावर आणि निवासी भागात पसरत होती. बांधकाम ढिगाऱ्यांची अयोग्य विल्हेवाट, रस्त्यावर पडणारा सिमेंट कचरा आणि प्रदूषण नियंत्रण यंत्रणांचा अभावही तपासणीत समोर आला आहे.
परिणामी महापालिकेने संबंधित विकासकांना नोटिसा बजावत तातडीने सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेने स्पष्ट इशारा दिला आहे की, नियमांचे पालन न करणाऱ्या प्रकल्पांचे बांधकाम परवाने निलंबित केले जाऊ शकतात. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाकड, पुनावळे, रावेत, ताथवडे, चऱ्होली, मोशी, चिखली, थेरगाव, पिंपरी, बोपखेल,
पिंपळे सौदागर, कासारवाडी आणि दापोडी या भागांमध्ये तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. शहरातील झपाट्याने वाढणाऱ्या बांधकामांमुळे या परिसरात प्रदूषणाचा स्तर चिंताजनक बनला आहे. या कारवाईच्या कक्षेत अनेक नामांकित बांधकाम कंपन्यांचाही समावेश आहे.
“विकास हवा, पण नागरिकांच्या आरोग्याच्या किंमतीवर नाही. नियम मोडणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही,” असा स्पष्ट संदेश महापालिका प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, वाढत्या प्रदूषणामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी महापालिकेच्या या कारवाईचे स्वागत केले असून आता प्रत्यक्षात किती प्रकल्पांवर कठोर कारवाई होते, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.
“ज्या बांधकामच्या ठिकाणी प्रदुषण होत आहे त्या ठिकाणी उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या होत्या. मात्र सूचनांकडे दुर्लक्ष करून बांधकाम सुरू ठेवलेल्या १७९ बांधकामांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यानंतरही उपाययोजना केल्या नाहीत तर त्यांचे बांधकाम परवाना रद्द करू.”
– संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महानगर पालिका.






