PCMC Abhay Yojana – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत चालू आर्थिक वर्षात तब्बल ८६० कोटी ५९ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला आहे. नागरिकांचा वाढता प्रतिसाद, कर संकलन विभागाचे नियोजनबद्ध कामकाज, विविध सवलतींची प्रभावी अंमलबजावणी तसेच ऑनलाइन व ऑफलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे कर संकलनात लक्षणीय वाढ झाली आहे. ज्या थकबाकीदार नागरिकांनी अद्याप मालमत्ता कर भरलेला नाही त्यांनी अभय योजनेचा लाभ घेऊन तात्काळ कर भरणा करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. थकबाकीदार नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेमार्फत अभय योजना लागू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत दि. १ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत थकीत मालमत्ता कराची रक्कम एकरकमी भरल्यास विलंब दंडावर तब्बल ९० टक्के सवलत देण्यात येत आहे. अभय योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अवघे ५ दिवस शिल्लक राहिले आहे. पिंपरी चिंचवड शहरात सध्या निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक व इतर मिळून सुमारे ७ लाख ३२ हजार मालमत्तांची नोंद असून त्यापैकी ५ लाख ७२ हजार ९०२ मालमत्ताधारकांनी मालमत्ता कराचा भरणा केला आहे. दरवर्षी कर भरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत असून नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप कर भरलेला नाही, अशा थकबाकीदारांवर कर संकलन विभागामार्फत नियमानुसार जप्ती तसेच नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. अशी माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी दिली. “कर संकलन विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या कामकाजामुळे आणि नागरिकांना उपलब्ध करून दिलेल्या सुलभ सुविधांमुळे कर वसुलीत लक्षणीय वाढ झाली आहे. अभय योजनेअंतर्गत दिली जाणारी ९० टक्के सवलत ही नागरिकांसाठी मोठी संधी असून, थकबाकीदारांनी या कालावधीत कर भरून दंडमाफीचा लाभ घ्यावा. तसेच कर न भरणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येत आहे.” – डॉ. विजय सुर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका