PCMC 60 Crore Scam : ६० कोटींचा घोटाळा सिद्ध, पण कारवाई का नाही? मनसेची थेट ईओडब्ल्यूकडे धाव
PCMC 60 Crore Scam : पिंपरी-चिंचवड पालिकेतील कथित ६०.१८ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मनसेची आर्थिक गुन्हे शाखेकडे मागणी.

PCMC 60 Crore Scam : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील कथित ६०.१८ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी दोषींवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. यासंदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने आर्थिक गुन्हे शाखेचे (EOW) पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
महापालिकेच्या निविदा प्रक्रिया व आर्थिक तरतुदींमध्ये फेरफार करून कोट्यवधी रुपयांची बिले बेकायदेशीररीत्या अदा करण्यात आल्याचा आरोप मनसेने केला आहे. चौकशी समितीच्या १२ मे २०२६ रोजीच्या अहवालात भ्रष्टाचार सिद्ध झाल्याचा दावा करत, अद्याप कोणतीही कायदेशीर कारवाई न झाल्याबद्दल मनसेने तीव्र नाराजी व्यक्त केली.
मनसेचे शहर सचिव रुपेश बाजीराव पटेकर यांनी दिलेल्या तक्रारीत संबंधित अधिकारी, अवैध उपसूचना मंजूर करणारे नगरसेवक, सहभागी कंत्राटदार आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता (BNS) व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, करदात्यांच्या पैशांचा गैरवापर करून कंत्राटदारांना अवैधरित्या लाभ मिळवून देण्यात आला. हा प्रकार फौजदारी विश्वासघात, फसवणूक आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच चौकशी अहवाल प्राप्त होऊनही महापालिका आयुक्तांनी कोणतीही कारवाई न केल्याने त्यांची भूमिकाही संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आला.
दरम्यान, “गुन्हा दाखल न झाल्यास मनसे न्यायालयात धाव घेणार असून फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६(३) अन्वये खाजगी तक्रार दाखल करण्यात येईल,” असा इशारा मनसेने दिला आहे. या वेळी मनसेचे उपाध्यक्ष राजू सावळे, बाळा दानवले आदी पदाधिकारी उपस्थित होते.





