NEET Paper Leak Case – नीट पेपर घोटाळ्यातील संशयित शिवराज मोटेगावकरच्या डेक्कन जिमखाना परिसरात भोगवटापत्राविना सुरू असलेल्या आरसीसी मोटेगावकर क्लासला अखेर महापालिकेने बुधवारी टाळे ठोकले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केल्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाने बुधवारी सकाळी ही कारवाई केली. मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी जंगली महाराज रस्त्यावर डेक्कन जिमखाना बस स्थानकासमोरील बोरावके इमारतीमध्ये आरसीसी मोटेगावकर क्लास बेकायदा चालवला जात आहे, या इमारतीला भोगवटापत्र नसल्याची तक्रार दोन महिन्यांपूर्वीच महापालिकेकडे केली होती. मात्र, त्या तरही कारवाई न केल्याने मनसेने मंगळवारी महापालिका आयुक्त कार्यालयात पैसा फेको आंदोलन केले. यानंतर आयुक्त नवलकिशोर राम यांनी तातडीने या क्लासला टाळे ठोकण्याचे आणि आठ दिवसांत पुढील कारवाई करण्याचा आदेश प्रशासनाला दिले होते. या इमारतीच्या मालकाने महापालिकेचे भोगवटापत्र न घेता परस्पर इमारतीचा वापर सुरू केला, तसेच मोटेगावकर क्लासचालकांनी अग्निशमन विभागाची नाहरकत न घेतल्याची बाब मनसेने महापालिकेच्या निदर्शनाला आणून दिली होती. मात्र, कोणतीही कारवाई न केल्याने आंदोलन केल्याचे संभूस यांनी सांगितले. “आरसीसी मोटेगावकर क्लासच्या या इमारतीचा भोगवटापत्र न घेताच वापर सुरू होता. त्यामुळे बुधवारी सकाळी महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन पथकाने क्लासला टाळे ठोकले आहे.” – अनिरुद्ध पावसकर, शहर अभियंता, महापालिका