पिंपरी | इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडन्ट स्पोर्ट्स स्पर्धेत पीसीईटीचे यश

पिंपरी, (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य इंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडन्ट स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित स्पर्धांमध्ये पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक (पीसीबी) मधील विद्यार्थ्यांनी वैयक्तिक व सांघिक गटात नेत्रदीपक यश मिळवले. विभागीय पातळीवर एकूण 16 झोन मध्ये आणि राज्य पातळीवर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. त्यापैकी डी -1 झोनमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी हे यश मिळविले.
यामध्ये सांघिक खेळात मुलांच्या गटाने फुटबॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन, कॅरम या खेळांमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. तर बास्केटबॉल, हॉलीबॉल आणि बुद्धिबळ यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. सांघिक खेळात मुलींनी कबड्डीमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. ॲथलेटिक्स मध्ये मुलांनी 100, 200, 400, 800 मीटर मध्ये आणि तिहेरी उडी, लांब उडी, थाळीफेक यामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.
मुलींनी कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. मुलींनी ॲथलेटिक्स मध्ये 100 मीटर, 400 मीटर आणि गोळा फेक मध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. प्रथम क्रमांक मिळवलेल्या संघाची आणि खेळाडूंची मार्च महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
विजेत्या खेळाडूंचे आणि क्रीडा प्रमुख एसएस कदेरे, प्राचार्य व्हीएस बॅकोड यांचे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर,खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.





