Paytm Payments Bank | भारतीय फिनटेक कंपनी पेटीएमने आज (16 फेब्रुवारी) रोजी आपले मुख्य खाते ( Nodal Account ) पेटीएम पेमेंट्स बँकेतून ( Paytm Payments Bank ) ॲक्सिस बँकेत (Axis Bank) हस्तांतरित केले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 15 दिवसांच्या सवलतीनंतर, पेटीएमने कळवले की त्यांनी पेटीएम पेमेंट्स बँकेतून ॲक्सिस बँकेत त्यांचे नोडल खाते हस्तांतरित केले आहे.
कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांची मूळ कंपनी One97 Communications ने आपले नोडल खाते ॲक्सिस बँकेत एस्क्रो खात्याद्वारे ( escrow account ) हस्तांतरित केले आहे आणि तेथे खाते उघडले आहे.
कोणत्याही अडथळ्याशिवाय होईल व्यापारी सेटलमेंट –
One97 Communications ने सांगितले की, Axis Bank मध्ये नोडल खाते हस्तांतरित केल्यानंतर, व्यापारी सेटलमेंट (merchant settlements) पूर्वीप्रमाणेच कोणत्याही व्यत्ययाशिवाय होत राहतील. बीएसईला सादर केलेल्या अहवालात कंपनीने म्हटले आहे की, पेटीएम क्यूआर (Paytm QR), साउंडबॉक्स (Soundbox), कार्ड मशीन पूर्वीप्रमाणे व्यापारी भागीदारांसाठी कोणत्याही व्यत्ययाशिवाय कार्यरत राहतील.
याचा अर्थ आता पेटीएमने आपले नोडल खाते ॲक्सिस बँकेत हस्तांतरित केल्यामुळे आणि त्याचा पेटीएम पेमेंट्स बँकेशी कोणताही संबंध नसल्यामुळे, व्यापाऱ्यांना व्यवहारासारख्या विविध वैशिष्ट्यांचा वापर करण्यात कोणताही व्यत्यय येणार नाही. ते पूर्वीप्रमाणे पेटीएम उत्पादने वापरण्यास सक्षम असतील.
Axis Bank ने एकत्र काम करण्याची व्यक्त केली होती इच्छा –
खाजगी क्षेत्रातील बँक ॲक्सिस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अमिताभ चौधरी यांनी अलीकडेच एक निवेदन दिले होते की, जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मंजूरी दिली तर ॲक्सिस बँक पेटीएमसोबत काम करू इच्छित आहे. त्यानुसार आता पेटीएमचे मुख्य खाते एॅक्सिस बॅंकेत हस्तांतरित करण्यात आले आहे.
पेटीएमचा शेअर वधारला –
पेटीएम पेमेंट बँकेचा शेअर आज पाच टक्कयांनी वाढला. गेल्या अनेक दिवसापासून या शेअरचा भाव एकतर्फी घसरत होता. आज या कंपनीच्या शेअर पाच टक्क्यांनी वाढून 341 रुपयावर गेला. आज शेअर बाजारातही सकारात्मक वातावरण होते. त्याचा थोडाफार फायदा पेटीएमला झाला. रिझर्व्ह बँकेने या बँकेवरील निर्बंधाच्या अंमलबजावणीला पंधरा दिवसाची मुदतवाढ दिली आहे. एवढीच एक सकारात्मक घटना आज घडली आहे. मात्र या कंपनीविरुद्ध केंद्रीय चौकशी संस्था चौकशी करीत आहेत. या परिस्थितीत काहीही फरक पडलेला नाही.