nagar | शेतकऱ्यांच्या पिकविम्याचे पैसे त्वरित द्या

नेवासा, (प्रतिनिधी) – खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये पिकविमा भरलेल्या नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांचे पैसे त्वरित द्यावे, अशी मागणी भाजपाचे मनोज पारखे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये कपाशी तूर, सोयाबीन इत्यादी पिकांचा पीकविमा उतरवला होता ,परंतु पावसाचा मोठा खंड पडल्याने नेवासा तालुका दुष्काळाच्या ट्रिगरमध्ये बसलेला आहे तसेच सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेले आहे.
अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी दाखल केल्या आहेत, परंतु अद्याप एकाही शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळालेली नाही. सोयाबीन या पिकांचे २५ टक्के अग्रीम रक्कम मिळाली परंतु उर्वरित रक्कम अद्याप मिळालेली नाही, ही रक्कम मिळाल्यास आगामी हंगामामध्ये शेतकऱ्यांना पेरणी, बियाणे, खते घेण्यासाठी मदत होणार आहे.
या गोष्टींचा गांभीर्याने विचार करून पुढील १५ दिवसांमध्ये शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम मिळवून देण्यात यावी, अन्यथा भारतीय जनता पक्षाच्यावतीने कार्यालयासमोर तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी दिला.
तालुका कृषी अधिकाऱ्यांच्यावतीने उन्हाळे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी प्रगतशील शेतकरी राजेश कडू पाटील, आदिनाथ पटारे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य निरंजन डहाळे,ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष विलास बोरुडे,अजितसिंह नरुला आदी उपस्थित होते.





