कोल्हापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोल्हापूर दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली. काही जणांना वाटतं की ते खूप मोठे नेते झाले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व त्यांच्याच हातात आहे. त्यांनी आपल्या पक्षाकडे लक्ष द्यावं, आम्ही आमच्या पक्षाचं बघतो. दुसऱ्याच्या पक्षात नाक खूपसण्याचं काही कारण नाही, असं म्हणत अजित पवारांनी रोहित पवार यांना थेट टोला लगावला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानावर तातडीने पंचनामे राज्यात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे. याबाबत अजित पवार म्हणाले, “शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकार म्हणून आम्ही अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोणत्याही आदेशाची वाट पाहू नका, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.” यामुळे शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा आहे. कोल्हापूरात मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे उद्घाटन अजित पवार यांनी कोल्हापूरातील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या उद्घाटनाबाबतही भाष्य केले. उद्या (17 ऑगस्ट) देशाचे सरन्यायाधीश यांच्या हस्ते या खंडपीठाचे उद्घाटन होणार आहे. “कोल्हापुरात खंडपीठ व्हावे, ही अनेक वर्षांपासूनची मागणी होती. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील नागरिकांना याचा फायदा होईल,” असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला. बीडमधील राजकीय खेळी आणि रोहित पवारांवर टीका अजित पवार यांनी बीडमध्येही आपली राजकीय रणनीती पुढे रेटली आहे. पंकजा मुंडे यांचे समर्थक राजाभाऊ आणि बाबरी मुंडे यांना पक्षात घेऊन त्यांनी भाजपला धक्का दिला आहे, तर शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याशी जवळीक वाढवत शरद पवार यांना आव्हान देण्याची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांच्यावर केलेली टीका त्यांच्या वाढत्या राजकीय प्रभावाला लगाम घालण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.